सुरु झालेत RED, ORANGE, GREEN; कोरोनाचे झोन नव्हे तर वाहतुकीचे सिग्नल!

नाशिकमध्ये बाजारात, रस्त्यांवर माणसांचा वावर दिसू लागला आहे. विशेष म्हणजे गेले सत्तर दिवस बंद असलेल्याशहरातील रेड, ग्रीनआणि आॅरेंज दिव्यांची उघडझाप देखील सुरु झाली. मात्र कोरोनाच्या झोनची नव्हे तर रस्त्यावरच्या वाहतूक सिग्नलची.
Traffic Signals in Nashik Started from Today
Traffic Signals in Nashik Started from Today

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आजपासून 'मिशन बिगीन अगेन' या घोषवाक्‍यानुसार लॉकडाउन- 5.0 ला प्रारंभ झाला. यात पूर्वीच्या लॉकडाउनपेक्षा अधिक शिथिलता आली आहे. बाजारात, रस्त्यांवर माणसांचा वावर दिसू लागला. विशेष म्हणजे गेले सत्तर दिवस बंद असलेल्या शहरातील रेड, ग्रीन आणि आॅरेंज दिव्यांची उघडझाप देखील सुरु झाली. मात्र कोरोनाच्या झोनची नव्हे तर रस्त्यावरच्या वाहतूक सिग्नलची. 

शहरातील रस्त्यांवर पुन्हा वर्दळ दिसू लागली आहे. आज रस्त्यावर नेहेमीपेक्षा अधिक वाहने व त्यांची धावपळ होती. अर्थात प्रत्येक चौकात नेहेमीसारखे वाहतूक पोलिस नव्हते. कोरोनाचे जसे रेड, हिरवा व नारंगी झोन होते. त्यावर सर्व जनजीवन व व्यवस्था नियंत्रीत होत होती, अगदी तसेच वाहतूक नियंत्रणाच्या सिग्नलचे देखील लाल, हिरवा व नारंगी हे तीन दिवे उघडझाप करुन वाहतून नियंत्रीत करतात. ते दिवे मात्र सुरु झालेले दिसले. हे जनजीवन सामान्य होण्याकडे वाटचाल सुरु आहे याचे निर्र्शक आहे. शहराचा व्यापार-उदीम सुरु होण्याची आशा दाखवणारा किरण होता. कोरोनामुळे जे गडद नैराश्‍य निर्माण केले होते, त्यातून बाहेर पडण्याची सुरवात झाली. त्यामुळे आजचा दिवस आकाश निरभ्र नसले, आभाळ दाटलेले, पावसाची चिन्हे सांगणारे असले तरी देखील नव्या सुरवातीचे स्वागत करणारेच वाटत होते. नाशिक शहरातील ही आजची उत्साही सकाळ होती. 

जिल्हा प्रशासनाला सर्वाधिकार

राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार आठवडाभरानंतर प्रार्थनास्थळे, रेस्टॉरंट, हॉटेल आणि काही प्रमाणात मॉल सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला सर्वाधिकार असणार आहेत. मात्र, शाळा, महाविद्यालये बंदच राहणार असून, 15 जूनपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होईल. मात्र त्यासंदर्भातही शासनाकडून लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे. यातील जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार, 1 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउन-5.0 सुरु झाला आहे. यामध्ये रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत जमावबंदीचे आदेश कायम असतील. 65 वर्षांवरील वृद्ध, गर्भवती महिला व दहा वर्षांखालील लहान मुलांनी घरातच सुरक्षितरीत्या थांबावे अशा सूचना आहेत. कोरोनामुळे प्रतिबंधात्मक क्षेत्रात जीवनावश्‍यक सेवा वगळता अन्य सेवा बंद, शाळा, महाविद्यालये, क्‍लासेस बंद, श्रमिक रेल्वे वगळता अन्य रेल्वे बंदच राहतील. 

व्यायामाला परवानगी

राज्यात येत्या 3 जून पासून गर्दी न करता पहाटे पाच ते सात यावेळेत व्यायामास परवानगी मिळेल. प्लंबर, इलेक्‍ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आणि टेक्‍निशियन्स यांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करून कामे करण्यास परवानगी दिली जाईल. 5 जून पासून सकाळी नऊ ते पाच यावेळेत व्यावसायिकांना मुभा. मात्र नियमांचे पालन बंधनकारक राहील. टॅक्‍सीत चालक-दोन प्रवासी, रिक्षात चालक-दोन प्रवासी, कारमध्ये चालक-दोन प्रवासी, तर दुचाकीवर फक्त चालक. तसेच 8 जून पासून खासगी आस्थापनांमध्ये दहा टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु करण्यास परवानगी असेल तर जिल्हांतर्गत बस प्रवासात 50 टक्के प्रवाशांना परवानगी दिली जाईल. कोरोनातून पोस्ट कोरोनाकडे हा प्रवास आहे. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com