पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास राज्य सरकारची मान्यता 

मुंबई येथे मंगळवारी (ता. 4 ऑगस्ट) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतपुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे प्रकल्प राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली. महाराष्ट्र सरकारचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे.
State Government approves Pune-Nashik Semi High Speed ​​Railway Project
State Government approves Pune-Nashik Semi High Speed ​​Railway Project

मंचर (जि. पुणे) : मुंबई येथे मंगळवारी (ता. 4 ऑगस्ट) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे प्रकल्प राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली. महाराष्ट्र सरकारचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या रेल्वेच्या माध्यमातून पुणे, नाशिक शहरांसह पुणे, नगर, नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळणार आहे. या लोहमार्गावरून प्रवासी वाहतुकीसह कृषी उत्पादने आणि माल वाहतुकीलाही परवानगी असणार आहे. 

महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लिमिटेड तथा "महारेल'च्या वतीने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. 

या वेळी कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार हेमंत गोडसे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार दिलीप मोहिते, आमदार अशोक पवार, आमदार चेतन तुपे, आमदार डॉ. किरण लोहमटे, आमदार सरोज आहिरे आदी लोकप्रतिनिधींसह "महारेल'चे महाव्यवस्थापक, वित्त, नियोजन, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष आणि व्हिसीद्वारे उपस्थित होते. 


याबाबत कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा हा प्रकल्प एकूण 16 हजार 39 कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी 60 टक्के रक्कम म्हणजे 9 हजार 629 कोटींचा वाटा विविध वित्तीय संस्थांचा असणार आहे. रेल्वेचा वाटा 20 टक्के म्हणजेच 3 हजार 208 कोटींचा असणार आहे. महाराष्ट्र सरकारचाही वाटा 20 टक्के म्हणजेच 3,208 कोटींचा वाटा असणार आहे. विद्युतीकरणासह एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाइनचे काम होणार आहे. 

पुणे-नाशिक हायस्पीड प्रकल्पात 235 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग असून तो पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतून जाणार आहे. या हायस्पीड रेल्वेगाडीचा प्रतितास 200 किलोमीटर वेग असून पुढे हा वेग 250 किलोमीटरपर्यंत वाढविता येणार आहे. पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासांत पूर्ण करता येणार आहे. 

पुणे-नाशिक लोहमार्गादरम्यान 24 स्थानकांची आखणी करण्यात आली आहे. त्यात 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. या लोहमार्गावरून प्रवासी आणि मालवाहतूक चालणार आहे. रेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह, स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे. 

या बैठकीत महाराष्ट्र राज्याचा वाट्याच्या 3,208 कोटीस तत्वतः मान्यता देण्यात आली. लवकरच हा आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करून त्याला मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येणार आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com