जळगावात भाजपला जबर धक्का...२७ नगरसेवक सेनेच्या गळाला - Setback to bjp in jalgaon mayor election shivsena set sangli pattern | Politics Marathi News - Sarkarnama

जळगावात भाजपला जबर धक्का...२७ नगरसेवक सेनेच्या गळाला

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 मार्च 2021

सांगलीमध्ये भाजपकडं बहुमत असूनही जयंत पाटलांनी 'करेक्ट कार्यक्रम' करून राष्ट्रवादीचा महापौर केला. आता हाच सांगली पॅटर्न जळगाव महापालिकेत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

जळगाव : सांगलीमध्ये भाजपकडं बहुमत असूनही जयंत पाटलांनी 'करेक्ट कार्यक्रम' राष्ट्रवादीचा महापौर केला. आता हाच सांगली पॅटर्न जळगाव महापालिकेत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. महापालिकेतील भाजपची सत्ता उलथविण्यासाठी शिवसेने फासे टाकले असून त्यांच्या गळाला २७ नगरसेवक लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप व माजी मंत्री गिरीश महाजन यांना महापौर निवडणुकीत जबर धक्का बसेल, अशी चर्चा आहे.

जळगावमध्ये १८ मार्च रोजी महापौर व उपमहापौरांची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून जळगाव महापालिकेत हालचाली सुरु आहेत. भाजपकडून विद्यमान महापौर भारती सोनवणेंनी मुदतवाढीसाठी तर अन्य दोघांनी या पदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर शिवसेनेकडूनही जोरदार तयारी केल्याचे समजते. 

हेही वाचा : बंगालमध्ये भाजपची खेळी - केंद्रीय मंत्री, खासदारांना विधानसभेचे तिकीट

भाजपमधून महापौरपदासाठी उमेदवाराची निवड आज होणार होती. मात्र, त्याआधीच काही सदस्य नॉट रिचेबल असल्याची चर्चा सायंकाळी सुरु झाली. त्यामुळे ही निवड झाली नाही. भाजपचे २० हून अधिक सदस्य गायब असल्याचे समजते. हे सर्वजण मुंबईत गेल्याचे समजते. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी महापौर निवड बिनविरोध होऊ देणार नाही, असे संकेत यापूर्वीच दिले होते.

हेही वाचा : काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांचे मुंडन - कारण वाचून व्हाल हैराण

शिवसेनेकडून उमेदवार निश्चित

भाजपचे सदस्य गायब झालेले असतानाच शिवसेनेने आजच महापौरपदाचा उमेदवार ठरवला आहे. जयश्री सुनील महाजन या महापौरपदाच्या तर उपमहापौर पदासाठी भाजपमधून येणाऱ्या कुलभूषण पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेने सांगली पॅटर्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राबविल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत. 

एकनाथ खडसेंचा डाव

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही शिवसेनेला साथ दिल्याचे समजते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सेनेचे संजय सावंत, पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या खेळीत तेही सहभागी झाल्याची चर्चा आहे. खडसे समर्थक सदस्यांसह गिरीश महाजन व आमदार राजूमामा भोळेंवर नाराज सदस्य शिवसेनेकडे येण्याची दाट शक्यता आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख