मालेगावला बंदोबस्तातील 'एसआरपी'च्या ८२ जवानांचे घेतले नमुने - Sample of Eighty Two SRPF Personnel taken in Malegaon As Precautionary Measure | Politics Marathi News - Sarkarnama

मालेगावला बंदोबस्तातील 'एसआरपी'च्या ८२ जवानांचे घेतले नमुने

सरकारनामा ब्युरो
रविवार, 3 मे 2020

संबंधित जवानांना गडचिरोली येथे बंदोबस्तासाठी पाठविले जाणार आहे. खबरदारी म्हणून त्यांची कोरोना टेस्ट केली जात आहे. कुणी पॉझिटिव्ह आढळला तर त्याला २१ दिवस क्वारंटाइन केले जाईल

धुळे : शहरातील साक्री रोडवरील जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) पहिल्या पाच दिवसांत कोरोना विषाणूच्या संशयित १४० रुग्णांची तपासणी केली आहे. त्यात मालेगाव येथे २७ एप्रिल ते एक मेपर्यंत बंदोबस्तास असलेल्या "एसआरपी'च्या येथील 82 जवानांचा समावेश असून, खबरदारीसाठी त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली.

'सिव्हिल'मध्ये २७ एप्रिलपासून रुग्ण तपासणीला सुरवात झाली. एकाच दिवशी ९९ रुग्णांची तपासणी व त्यांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले. अधिकारी डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. संजय शिंदे, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. अभय शिनकर, डॉ. दिनेश दहिते, डॉ. रवी सोनवणे, डॉ. अभिषेक पाटील व परिचारिका श्रीमती मोरे, संगीता चव्हाण, सुरेखा निकम, स्टर कांबळे यांनी परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांच्या सूचनेनुसार या रुग्णालयात तपासणी सुरू केली. यात १४० पैकी ४१ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 99 रुग्णांचे अहवाल श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात प्रलंबित आहेत. त्यात "एसआरपी'च्या जवानांचा समावेश आहे, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

गडचिरोलीला पाठविण्यापूर्वी...

दरम्यान, संबंधित जवानांना गडचिरोली येथे बंदोबस्तासाठी पाठविले जाणार आहे. खबरदारी म्हणून त्यांची कोरोना टेस्ट केली जात आहे. कुणी पॉझिटिव्ह आढळला तर त्याला २१ दिवस क्वारंटाइन केले जाईल. सद्यःस्थितीत संबंधित जवान जिल्हा पोलिस प्रशिक्षण केंद्रात आहेत, असे सूत्रांनी सांगितले

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख