निवृत्तीनाथ यात्रेत राजकीय नेत्यांना वगळल्याने वारकरी खुष ! - Political leaders dropp in Nivruttinath Yatra. Divotees happy. Nashik politics | Politics Marathi News - Sarkarnama

निवृत्तीनाथ यात्रेत राजकीय नेत्यांना वगळल्याने वारकरी खुष !

संपत देवगिरे
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली. यावेळी निवडक व मानाच्या दिंड्यांनाच परवानगी देण्यात आली होती. विशेष म्हणजे पौष वारीनिमित्त होणा-या पाच पुजा लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांच्या हस्ते होण्याचा पायंडा खंडीत करीत या पुजा वारक-यांच्या हस्ते करण्यात आल्या.

नाशिक : संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली. यावेळी निवडक व मानाच्या दिंड्यांनाच परवानगी देण्यात आली होती. विशेष म्हणजे पौष वारीनिमित्त होणा-या पाच पुजा लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांच्या हस्ते होण्याचा पायंडा खंडीत करीत या पुजा वारक-यांच्या हस्ते करण्यात आल्या. त्यामुळे यंदाच्या यात्रेत कोणतिही गैरसोय न होता वारकरी तृप्त होऊन घराकडे परतले. 

वारकरी संप्रदाय व त्यांच्या परंपरा या महाराष्ट्र व मराठी माणसाचा मानबिंदू मानला जातो. मात्र कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील पंढरपुरसह विविध संस्थानच्या वारीतील वारक-यांच्या दिंड्या देखील स्थगित झाल्या. याच परंपरेतील त्र्येबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनाचा प्रघात पौष वारी निमित्ताने होणारी यात्रा नुकत्याच नियुक्त झालेल्या प्रशासक मंडळाने रद्द केली. हे करताना अतीशय कमी कालावधी असतानाही या मंडळाने या वारीचे नियोजन केले. त्यात प्रथेप्रमाणे येणा-या मानाच्या दिंड्या वगळता अन्य कार्यक्रम रद्द केले. तरीही नेम न चुकता व कोणताही गाजावाजा न करता समाधीच्या दर्शनाला येणारे वारकरी आले. 

या यात्रेत प्रथेप्रमाणे पाचच पुजास होतात. त्याला राजकीय नेते, मंत्री व व्हीआयपी मंडळींना निमंत्रीत केले जाते. त्यामुळे या कालावधीत वारक-यांना ताटकळत थांबावे लागते. व्यव्सथेवर ताण येतो. वारकरी म्हणजे लोकेशना (प्रसिद्धी), वित्तेशना (धन) आणि दारेशना (परस्त्री लोभ) यांपासून अलिप्त राहण्याचा संस्कार धारण केलेला भक्त असल्याने ते कधी याबाबक कुरकुर करीत नाहीत. मात्र प्रशासक मंडळाने या पाचही पुजा राजकीय नेते, लोकप्रतिनिधींना टाळून वारक-यांच्याच हस्ते करण्याचा निर्णय घेतला. त्याने पौष वारी कोणतिही गर्दी, तक्रारी व गोंधळाशिवाय पार पडली. हा निर्णय वारक-यांनाही आनंददायक होता. त्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन हे वारकरी आनंदात घराकडे परतले. 

यावेळी वारीसाठी येणा-या मानाच्या दिंड्या, फडकरी, वारकरी यांची संस्थानात व्यवस्था करण्यात आली. एकादशीचा सोहळा पार पडल्यावर ह. भ. प. कान्होबा महाराज देहूकर यांचे किर्तन झाले. त्यानंतर राज्यभरातून आलेल्या दिंडीक-यांचे संस्थानचे प्रशासक मंडळ सदस्य अॅड भाऊसाहेब गंभीरे यांनी सन्मान केला. यावेळी सहाय्यक धर्मदाय आयुक्त कृष्णा सोनवणे यांनी वारकरी बांधवांना धन्यवाद दिले. पुजाधिकारी जयंत गोसावी यांनी संयोजन केले. श्रीक्षेत्र आळंदी येथील ह. भ. प. बाळासाहेब आफळकर, संत कुताराम महाराज यांचे वंशज ह. भ. प. बाळासाहेब देहुकर, बेलापूरकर महाराज, रंगनाथ महाराज, बाळकृष्ण महाराज डावरे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड गंभीरे यांनी श्री. निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीसाठी येणा-या दिंड्यांची माहिती संकलित केली जाईल असे सांगितले. 
 

असे आहे प्रशासक मंडळ...
या संस्थानच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपली होती. पुर्णतः वारकरी संप्रदायाची ही  राज्यातील एकमेव संस्था आहे. वारक-यांव्यतिरीक्त इतरांना त्यात स्थान नाही. त्यामुळे धर्मदाय आयुक्तांनी वारीच्या पार्श्वभूमीवर येथे प्रशासक मंडळ नेमले. त्यात सहाय्यक धर्मदाय आयुक्त कृष्णा सोनवणे, त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप रणदिवे, त्र्यंबकेश्वरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जाधव, फिट पर्सन भाऊसाहेब गंभीरे यांचा समावेष आहे.
... 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख