गुजरातचा वर; नाशिकची वधू - पोलिस बनले वऱ्हाडी आणि गाण्यातून दिल्या शुभेच्छा! - Police Initiated Marriage Function in Nashik Gave Blessings to Couple | Politics Marathi News - Sarkarnama

गुजरातचा वर; नाशिकची वधू - पोलिस बनले वऱ्हाडी आणि गाण्यातून दिल्या शुभेच्छा!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 29 एप्रिल 2020

असं म्हणतात की लग्नगाठी स्वर्गातच जुळतात. त्यात कितीही अडसर अन् संकटे आली तरी त्या पक्क्या होतातच. काल अगदी हुबेहूब असेच घडले. कोरोना आणि संचारबंदीने अनेक विवाह पुढे ढकलले जात आहेत. रद्द होत आहेत. मात्र निश्‍चय केला तर कोरोनावर देखील मात करता येते हे पहायला मिळाले

नाशिक : असं म्हणतात की लग्नगाठी स्वर्गातच जुळतात. त्यात कितीही अडसर अन् संकटे आली तरी त्या पक्क्या होतातच. काल अगदी हुबेहूब असेच घडले. कोरोना आणि संचारबंदीने अनेक विवाह पुढे ढकलले जात आहेत. रद्द होत आहेत. मात्र निश्‍चय केला तर कोरोनावर देखील मात करता येते हे पहायला मिळाले. 'तो' गुजरातहून नाशिकला आला. त्याने आपले ठरलेले लग्न कोणताही बडेजाव न करता फ्लॅटमध्येच पार पाडले. 

यावेळी एक नव्हे दोन ठाण्यांचे पोलिस देखील इमारतीच्या खाली या विवाहाच्या घोषणेची वाट पहात होते. वधु-वर गॅलरीत आले अन् त्यांनी हात उंचावून लग्न झाल्याची घोषणा केली. तेव्हा उपस्थित पोलिसांनी चक्क त्यांना शुभेच्छा देत टाळ्या वाजवल्या. परिसरात हे समजले ते पोलिसांच्या व्हॅनमधून 'मुबारक हो सबको ये शादी़ तुम्हारी' हे गाणे वाजल्यावर.

गुजरातचा नवरदेव आणि नाशिकच्या अशोका मार्ग परिसरातील नवरी मुलगी यांचा गेल्या रविवारी शुभविवाह निश्चित होता. पण लॉक डाउनमुळे या विवाहावर अनिश्चिततेचे ढग होते. पण 'तो' आला आणि ...त्यांचे लग्नही देखील झाले. त्यासाठी चक्क पोलिस मदतीला आले. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. गुजरातचा निकुंज आणि नाशिकची हरिणी जोशी यांचा विवाह गेल्या रविवारी ठरलेला होता. 

नातेवाईक होते व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारा 'उपस्थित'

मात्र, कोरोना विषाणूमुळे त्यांच्या विवाहावर अनिश्चिततेचे ढग होते. मात्र निकुंज याने गुजरात सरकारची परवानगी घेत एकट्याने नाशिक गाठले. अशोका मार्ग येथील हरिणी जोशी या नवंवधूच्या घरात विवाह सोहळा अतिशय मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. एवढेच नव्हे तर या विवाहासाठी नातलग व्हिडिओ कॉन्फरन्सने उपस्थित होत नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले.

त्याचवेळी नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुदगल, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले, मुंबई नाक्याचे पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस गाड्या अशोका मार्ग येथील जोशी यांच्या अपार्टमेंटच्या खाली पोहोचल्या.

पोलिसांनी वाजवले शुभेच्छा देणारे गाणे

पोलीस पाहून अनेकांच्या मनात धडकी भरली. मात्र जेव्हा सहाय्यक आयुक्त नखाते यांनी नवदाम्पत्याला पोलिसांकडून शुभाशिर्वाद देत असल्याचे माईकवरून सांगितले तेव्हा इमारतीच्या गॅलरीमध्ये नवदांम्पत्यासह अन्य गॅलरीतही रहिवाशी आले आणि टाळ्यांचा गजरात त्यांना शुभेच्छा दिल्या इतकेच नव्हे तर पोलिसांनी यावेळी 'मुबारक हो तुमको ये शादी तुम्हारी' हे गाणे वाजवून नवदाम्पत्याला शुभेच्छा देत त्यांचा छोटेखानी विवाह सोहळा संस्मरणीय केला. नाशिक पोलिसांनी केलेल्या या यादगार सोहल्यामुळे नववधू हरिणी जोशी हिचे डोळे आनंदाश्रूनी मात्र पाणावले. यामुळे नाशिक पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव होतो आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख