नाथाभाऊंच्या सत्कार सोहळ्यात खिसेकापूंचा विजयोत्सव - Pick Picketers went Rampant in Ekanath Khadse Welcome Rally | Politics Marathi News - Sarkarnama

नाथाभाऊंच्या सत्कार सोहळ्यात खिसेकापूंचा विजयोत्सव

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

ष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे वरणगाव बसस्थानक चौकात आगमन होताच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मात्र, या संधीचा फायदा घेत खिसेकापूने ६५ हजार रुपयांची चोरी करीत आपला विजयोत्सव साजरा केला.

वरणगाव (ता. भुसावळ)  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे वरणगाव बसस्थानक चौकात आगमन होताच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मात्र, या संधीचा फायदा घेत खिसेकापूने ६५ हजार रुपयांची चोरी करीत आपला विजयोत्सव साजरा केला. मात्र, या घटनेचे गांभीर्य ओळखत मुक्ताईनगर पोलिसांनी एका संशयितास गजाआड केले.

सत्कार कार्यक्रम सुरू असतांना कार्यकर्त्याच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मनीपर्स व खिशातील रोख रूपये लांबविली. पत्रकार सुरेश महाले यांच्या खिशामधून चोरट्यांनी १३ हजार रूपये लंपास केले. महाले यांच्या लक्षात ही बाब येतात त्यांनी वरणगाव पोलिसात तक्रार दिली. वरणगाव पोलिस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक संदिपकुमार बोरसे यांनी तपासचक्रे फिरविली. संशयिताला मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात घरफोडी, चोरी, रेल्वे पोलिसात जबरी लूटमारींचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे संशयित हा नाथाभाऊंच्या ताफ्याबरोबर मुंबई येथून मुक्ताईनगर पर्यंत होता. नाथाभाऊंचा जिथे- जिथे सत्कार करण्यात आला, त्या- त्या ठिकाणी त्याने आपला विजयोत्सव साजरा केला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. दरम्यान, संशयित एकटा नसून त्याच्या सोबत आणखी ७ ते ८ संशयित असण्याची शक्यता असल्याचे देखील पोलिसांचा अंदाज आहे.

वरणगाव बसस्थानक परिसर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नाथाभाऊंचे स्वागत करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, माजी नगरसेवक विष्णू खोले, गणेश चौधरी, रवींद्र सोनवणे, समाधान चौधरी, प्रकाश नारखेडे, माजी उपसरपंच साजिद कुरेशी, पप्पू जकातदार, राजेश चौधरी, गजानन वंजारी, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय. आर. पाटील, प्रशांत मोरे, ओबिसी सेलचे तालुकाध्यक्ष मनोज कोलते, सोहेल कुरेशी, अनिल चौधरी व भाजपतून राष्ट्रवादीत आलेले सुधाकर जावळे, प्रशांत पाटील, नितीन (बबलु) माळी, अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, दूध फेडरेशनच्या संचालिका शामल झांबरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यांची झाली पाकीटमारी
सुरेश महाले (पत्रकार) १३ हजार, अशोक भोई ३० हजार, एहसान निसार शेख १५००, चंद्रकात चौधरी ८ हजार, पप्पु जकातदार पाच हजार ३००, समद अली कासम अली २६०० रुपये.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख