एकनाथ खडसेंची कन्या अध्यक्ष असलेल्या बँकेला ईडीची नोटीस

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या पत्रानुसार कारवाई
एकनाथ खडसेंची कन्या अध्यक्ष असलेल्या बँकेला ईडीची नोटीस
Notice of ED to Jalgaon District Co-operative Bank

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई खासगी साखर कारखान्याला कर्जपुरवठा करण्यासह बँकेतील इतर आर्थिक व्यवहारासंबंधात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने नोटीस पाठवून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून माहिती मागवली आहे. भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना त्यांची कन्या चेअरमन असलेल्या बँकेकडून ही माहिती मागविण्यात आल्याने सहकार क्षेत्रात आणि खडसे समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Notice of ED to Jalgaon District Co-operative Bank)

केंद्र सरकारने सहकार खाते नव्याने निर्माण झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंदक्रांत पाटील यांनी केंद्रीय सहकार विभागाकडे राज्यातील काही साखर कारखान्यांतील व्यवहारांसंदर्भात चौकशी करण्यासाठी पत्र दिले होते. या पत्रामुळे राज्यात मोठा राजकीय धुराळा उडाला होता. त्या अन्वये ईडीने जिल्हा बँकेकडूनही मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाबाबत माहिती मागवली आहे.

हेही वाचा : बैलगाडा शर्यतींसाठी आता राज ठाकरेंना साकडे 
 
या संदर्भात, जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांना विचारले असता, ते म्हणाले की, महाराष्ट्रातील ४० कारखान्यांना दिलेल्या कर्जासंदर्भात विविध बँकांकडून ईडीने माहिती मागविली आहे. त्या अन्वये जिल्हा बँकेकडून मुक्ताई साखर कारखान्यास दिलेल्या कर्जाबाबत माहिती विचारण्यात आलेली आहे, अशी माहिती देशमुख यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली. 

दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणी या अगोदरच ईडीकडून नोटीस देण्यात आलेली आहे. या व्यवहाराच्या चौकशीसाठी खडसे यांनी काही दिवसांपूर्वी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली होती. तत्पूर्वी त्यांना कोरोना झाल्याने दोनवेळा त्यांच्या चौकशी पुढे ढकलण्यात आली होती. पण याच जमीन खरेदीप्रकरणी खडसे यांच्या जावयालाही अटक करण्यात आलेली आहे.

एकंदरीतच भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या खडसे यांच्या मागे ईडीचा फेरा लागला आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणीची ईडीकडून चौकशी सुरू असताना आता त्यांच्या कन्या रोहिणी खडसे अध्यक्ष असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी बँकेलाही साखर कारखान्यांना कर्ज दिल्याप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in