The new Chief Secretary shared old memories with MLA Bhuyar | Sarkarnama

नव्या मुख्य सचिवांनी सांगितली आमदार भुयार यांना जुनी आठवण

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 30 जून 2020

प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची पहिली नियुक्‍ती त्यांच्या स्मृतिपटलावर कशी कायमस्वरूपी कोरली जाते. काही दशकांनंतरही त्या नियुक्‍तीने प्रशस्त केलेल्या कारकीर्दीच्या ऋणातून उतराईचा कसा प्रयत्न केला जातो, याचे अत्यंत बोलके उदाहरण बुधवारी (ता. 1 जुलै)  महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारणारे संजय कुमार यांच्या रूपाने समोर आले आहे.

नाशिक : प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची पहिली नियुक्‍ती त्यांच्या स्मृतिपटलावर कशी कायमस्वरूपी कोरली जाते. काही दशकांनंतरही त्या नियुक्‍तीने प्रशस्त केलेल्या कारकीर्दीच्या ऋणातून उतराईचा कसा प्रयत्न केला जातो, याचे अत्यंत बोलके उदाहरण बुधवारी (ता. 1 जुलै)  महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारणारे संजय कुमार यांच्या रूपाने समोर आले आहे.

यातील त्यांच्या प्रशासकीय गतिमानतेचा सुखद धक्‍का अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरूड व शेंदुरजना घाट या नगरपालिकांनी अनुभवला. 

मागच्या सरकारमधील कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना पराभूत करून आमदार बनलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार व जगदीश इनामदार यांनी संजय कुमार यांचा हा अनुभव सांगितला. कुमार सध्या गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्‍त मुख्य सचिव आहेत व गृह खात्याचाही अतिरिक्‍त कार्यभार सांभाळतात.

गेल्या डिसेंबरमध्ये किसान समन्वय समितीच्या बैठकीच्या निमित्ताने माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासमवेत आमदार भुयार व इनामदार दिल्लीत होते. दोघांनी मोर्शी मतदारसंघातील तीनही नगरपालिकांचा पंतप्रधान आवास योजनेच्या चौथ्या टप्प्याचा निधी मिळावा; म्हणून संबंधित संचालकांची भेट घेतली. त्यानंतर कुमार यांच्या नावाचे पत्र तीन आठवड्यांत संचालकांकडून प्राप्त झाले. ते घेऊन गेल्या 9 जानेवारी रोजी दोघे कुमार यांना भेटले. त्यांनी लगेच म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांना फोन लावला आणि तत्काळ निधी मंजूर करा, या आमदारांनी आपल्याला कार्यालयात घेराव घातला आहे, असे सांगितले. 

हा घेरावचा उल्लेख ऐकून भुयार व इनामदार दोघेही चक्रावले. म्हाडा कार्यालयातून संबंधित अधिकारी अतिरिक्‍त मुख्य सचिवांच्या कार्यालयात येईपर्यंत स्वत: कुमार यांनी त्याचा खुलासा केला. आयएएस झाल्यानंतर परिविक्षाधीन अधिकारी म्हणून 1985 मध्ये त्यांची नेमणूक अमरावती येथे झाली होती. त्या वेळी मोर्शी मतदारसंघाचा अंतर्भाव रामटेक लोकसभा मतदारसंघात होता आणि पुढे पंतप्रधान झालेले पी. व्ही. नरसिंह राव त्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व करीत होते. हा सगळा संत्रा उत्पादक पट्टा. त्याला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणतात.

त्या वेळी गारपिटीने संत्राबागांचे मोठे नुकसान झाले होते आणि स्वत: नरसिंह राव मतदारसंघात नुकसानीचा आढावा घेण्यासाठी फिरत होते. त्यांच्या मदतीला प्रशासनाने कुमार यांना नेमले होते. शेंदुरजना घाटच्या ग्रामपंचायतीत त्यानिमित्ताने आठ-दहा दिवस मुक्‍काम करावा लागला आणि डास चावल्याने मलेरिया झाला. 

सुमारे 35 वर्षांनंतर, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विविध पदांवर काम केल्यानंतरही कुमार ती आठवण विसरले नाहीत. कारण, ते प्रसंग पहिल्या नेमणुकीचे होते. शेदूरजना घाटचे जणू त्यांच्यावर काही ऋण आहे. त्यातून उतराई होण्यासाठी त्यांनी "घेराव'ची सबब पुढे केली. गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्‍त मुख्य सचिवांच्या पुढाकारामुळे वरूडसाठी दोन कोटी 37 लाख, मोर्शीसाठी पाच कोटी 77 लाख व शेंदुरजना घाट नगरपालिकेसाठी 66 लाख 60 अशा एकूण आठ कोटी 82 लाखांच्या निधी मंजुरीचे पत्र दुसऱ्याच दिवशी, 10 जानेवारीला आमदा भुयार यांच्या हाती पडले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख