कोरोना काळातही नाशिकचा सर्वांगीण विकास!

कोरोना विषाणूने ‘न भूतो न भविष्यति’ अशी परिस्थिती संपूर्ण जगावर निर्माण केली. बडी-बडी राष्ट्रे या आरोग्य आपत्तीसमोर टिकाव धरू शकली नाहीत; तद्वत अशा परिस्थितीत महाराष्ट्राने सर्वच स्तरावर यंत्रणा भक्कम करून परिस्थितीशी दोन हात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : कोरोना विषाणूने ‘न भूतो न भविष्यति’ अशी परिस्थिती संपूर्ण जगावर निर्माण केली. बडी-बडी राष्ट्रे या आरोग्य आपत्तीसमोर टिकाव धरू शकली नाहीत; तद्वत अशा परिस्थितीत महाराष्ट्राने सर्वच स्तरावर यंत्रणा भक्कम करून परिस्थितीशी दोन हात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या कालावधीत नाशिक जिल्हादेखील मागे राहिलेला नाही. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य दिले आहे.

नव्याने कोरोनासदृष्य स्थिती निर्माण होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले, सर्वाधिक घनता आणि देशाची सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेल्या मुंबईमध्ये आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. धारावी झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे, राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेचे पदाधिकारी यांनी लाट आता थांबणार नाही, विध्वंस होईल, या आणि अशा प्रकारच्या अनेक घोषणा केल्या. मात्र आपल्या यंत्रणेने त्यावर सक्षम उभे राहून मात केली. नाशिक जिल्ह्यात तसेच मालेगावमध्ये कोरोना उद्रेक परिस्थिती हाताळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागल्या. कधी नव्हे ते रमजानचा उत्सव घरात बसून साजरा केला, गणेशोत्सव म्हणजे आपल्या राज्याचे प्रतीक; मात्र त्यालाही मुकावे लागले. खरेतर हे यश यंत्रणेचे आहे; परंतु त्या यशाला सोनेरी किनार जनतेच्या समजूतदारीची आहे. या समजूतदारीने प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली. त्यामुळे कोरोनाला अटकाव आणता आला.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी अभूतपूर्व असा लॉकडाउन करण्यात आला. महाराष्ट्रात रोजंदारीवर काम करणाऱ्या परप्रांतीयांना रोजीरोटीचा प्रश्न उद्‌भवला. परप्रांतीय आपापल्या प्रांतात मिळेल त्या वाहनाने निघाले; वाहने नाही मिळाली तर पायपीट सुरू केली. शेकडो मैल अंतर पार करत असताना राज्य शासनाने खास रेल्वेची व्यवस्था करून देण्यासंदर्भात केंद्र सरकारसोबत यशस्वी चर्चा केली; परिणामी नाशिक येथून पहिली रेल्वे रवाना झाली. बिहार, उत्तर प्रदेशमधील कष्टकरी काही काळ नाशिकमध्ये वास्तव्याला होते. जिल्ह्यात त्यांच्यासाठी खास निवारागृहे सुरू करून त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यात आली. वस्त्र, खाण्याचे पदार्थ देण्याचे एक आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केल्या सरशी नाशिकमधील जनतेने उदारभावनेने मदत केली. या साऱ्याचा परिपाक म्हणजे हेच परप्रांतीय सुखरूप आपल्या घरी निघताना ‘जय महाराष्ट्र, जय मराठी’ असा जयघोष करत गेले.

अन्न-नागरी पुरवठ्याचे महत्त्व
लॉकडाउन अन्‌ अनलॉकच्या काळात राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागासोबत अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची राहिली. राज्यातील कुठलाही गोरगरीब नागरिक, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी विभागाचे सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच ५२ हजार ४२४ स्वस्त धान्य दुकानदार सतत कार्यरत आहेत. सामान्य परिस्थितीमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत महिन्यात साधारणतः साडेतीन लाख टन धान्य वितरित केले जाते. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या साडेतीन लाख टन मोफत तांदूळ त्याचप्रमाणे मेपासून केशरी कार्डधारकांना अतिरिक्त दीड लाख टन धान्यवाटप केले जात आहे. त्यामुळे दरमहा जवळपास साडेआठ ते नऊ लाख टन धान्य वितरित करण्यात येत आहे. तेवढ्याच यंत्रणेकडून किंबहुना कोरोनामुळे कमी असलेल्या यंत्रणेकडून नेहमीपेक्षा तीनपट काम करून घेण्यात आले.

ते पुढे म्हणाले, लॅाकडाउनमुळे विस्कळित झालेल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना दिवसाला दोन घास मिळवून देण्यासाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन थाळी’ महत्त्वाच्या टप्प्यावर उपयोगात आली. नुकताच या थाळीने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘माणूस केंद्रबिंदू’ आहे या विचाराने सुरू केलेल्या ‘शिवभोजन थाळीचे’ यश यातच दडलेले आहे. रेशनसंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे, वेळोवेळी होणारे त्याचे मूल्यमापन यामुळे आखलेल्या नियोजनाला यशस्वितेची किनार आली.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com