शेतकऱ्यांसाठी खूषखबर.....कांदा खरेदी होणारच आणि तीही चक्क ५० हजार टन!

खुल्या पद्धतीने कांदा खरेदी व्हावी, ही अनेक दिवसापासूनची मागणी. शाश्‍वत खरेदी व्हावी, असे उत्पादकांना वाटत होते. निर्णय कधी होतो, याची चिंता.. नका करून आता कांदा उत्पादकांना चिंता.. निर्णय झालाय... खरेदी होणार ती ही खुल्या पद्धतीने सोमवार (ता. ४) पासून एक नव्हे ...१० नव्हे चक्क ५० हजार टन.
NAPHED To Start Onion Purchase from 4th May
NAPHED To Start Onion Purchase from 4th May

नाशिक : 'नाफेड'च्या वतीने कांदा खरेदीचा निर्णय घेण्यात आला असून, राज्यात ५० हजार टन कांदा खरेदी होणार आहे. त्या अनुषंगाने बाजार समित्यांमधून खुल्या लिलाव पद्धतीने, तर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शिवार खरेदी पद्धतीने कांदा खरेदी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी बाजार समितीमधून कांद्याची खरेदी सोमवार (ता. ४) पासून सुरू होणार असल्याची माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली.

नाफेडच्या संचालक मंडळाच्या २९ एप्रिलला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मंजूर निविदा व कर्मचाऱ्यांची उपलब्धता या कारणांमुळे खरेदीचा निर्णय लांबला होता. मात्र यावर आता निर्णय झाल्याने कांदा खरेदीस प्रारंभ होणार आहे. त्या अनुषंगाने लासलगाव येथे कांदा खुल्या पद्धतीने लिलावासाठी नाफेड उतरणार आहे. तसेच पिंपळगाव बसवंत येथेही खरेदीची तयारी सुरू आहे. चांगली टिकवण क्षमता असलेला, उच्च गुणवत्तेच्या कांद्याच्या खरेदीला प्राधान्य दिले जाणार आहे.

शिवार खरेदी पद्धतीने कामकाज सुरु

सध्या 'नाफेड'कडे स्वमालकीचे, तसेच एनएचआरडीएफ व व्यापाऱ्यांच्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या कांदाचाळींची साठवणूक क्षमता १४ हजार टनांपर्यंत आहे. त्यातुलनेत मागील वर्षी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे अधिक साठवणूक क्षमता असल्याने त्यांच्याकडे कांदा साठवला होता. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना अधिक खरेदीसाठी प्राधान्य दिले जात आहे. सध्या शिवार खरेदी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील नायगाव (ता. सिन्नर), ताहाराबाद (ता. सटाणा), तर पुणे जिल्ह्यात नारायणगाव (ता. जुन्नर) येथे शिवार खरेदी पद्धतीने कामकाज सुरू झाले आहे. त्यानुसार या कंपन्या नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये खरेदी करणार आहेत.

खरेदीत वाढ करण्याची शेतकऱ्यांची मागणी

चालू वर्षी उन्हाळी कांदा लागवडीचे क्षेत्र कमालीचे वाढले आहे. सध्या कांदा काढणी होऊन बाजारात येणाऱ्या कांद्याला अपेक्षित दर नाही. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, भाव स्थिर राहण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ४५ हजार टनाचे राज्यात उद्दिष्ट होते. मात्र ४७ हजार टन खरेदी झाली होती. याही वर्षी पाच हजार टनांनी उद्दिष्ट वाढलेले आहे. यात अजून वाढ व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

खरेदी क्षमता वाढण्याची शक्‍यता

नाफेड या वर्षी ७० हजार टनापर्यंत कांदा खरेदी करेल, अशी शक्‍यता होती. मात्र ५० हजार टनाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. मात्र ही खरेदी ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्याने उद्दिष्ट वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना आग्रह धरल्यास खरेदीचे उद्दिष्ट वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हा केंद्रीय अन्नपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे रेटा लावून धरावा लागणार आहे.

दोन सत्रांत सातशे वाहनांतील मालाचाच लिलाव : सुवर्णा जगताप

लासलगाव : येथील बाजार समितीत सोमवारपासून मोकळ्या स्वरूपात वाहनांतून आलेल्या कांद्याचे लिलाव होणार आहेत. बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी ही माहिती दिली. जगताप यांनी सांगितले, की सोमवारपासून रोज सकाळी नऊ ते दुपारी १२ व दुपारी चार ते सायंकाळी सहा, या वेळेत फक्त ७०० वाहनांतून आलेल्या कांद्याचे लिलाव होणार आहेत. कांदा उत्पादकांनी आपला शेतीमाल योग्य प्रतवारी करून टप्प्याटप्प्याने विक्रीस आणावा. बाजार आवारात येताना सोशल डिस्टन्सिंग, तोंडावर मास्क अथवा रूमाल लावून व प्रवेशद्वारावर निर्जंतुक होऊन प्रवेश करावा, असे आवाहन दि लासलगाव मर्चंट्‌स असोसिएशनचे अध्यक्ष व बाजार समितीचे व्यापारी सदस्य नंदकुमार डागा यांनी केले.

चालू वर्षी केंद्राच्या कांदा खरेदीच्या सूचनेनुसार संचालक मंडळाचा निर्णय झाला आहे. मजुरांचा प्रश्‍न सुटल्यानंतर सोमवारपासून राज्यात बाजार समितीच्या माध्यमातून खुल्या पद्धतीने कांदा खरेदी करण्यात येणार आहे - नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड, नवी दिल्ली

नाफेड व महा-एफपीसीचा 'महाओनियन' हा संयुक्त उपक्रम आहे. त्या माध्यमातून २५ हजार टन साठवणूक क्षमता विकसित करण्यात येत असून, १५  ठिकाणी कामकाज सुरू आहे. शिवार खरेदीच्या माध्यमातून २५ हजार टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे - योगेश थोरात, अध्यक्ष, महा-एफपीसी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com