ईद घरीच साजरी केली जावी यासाठी कृषीमंत्री दादा भुसे रात्री सायकलने फिरले

ईदच्या पूर्वसंध्येला कृषीमंत्री दादा भुसे चक्क रात्री सायकलवरुन शहरात फिरून नागरीकांना "घरातच रहा. बाहेर पडू नका' हे सांगत फिरले. त्यादृष्टीने मुस्लीम समाजबांधवांसाह सगळ्यांसाठी घरातच साजरी केलेली ईद आगळी वेगळी ठरली.
Minister Dada Bhuse Roamed in Malegaon To Appeal People to Stay at Home
Minister Dada Bhuse Roamed in Malegaon To Appeal People to Stay at Home

नाशिक : कोरोनाचा संसर्ग व त्या पार्श्‍वभूमीवर आज साजरा होत असलेला मुस्लीम धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणजे रमजान ईद. मालेगावात तर एरव्ही या ईदसाठी देशभरातून जकात साठी बांधव जमा होतात. मात्र यंदाची ईद घरीच साजरी करा. घराबाहेर पडू नका, यासाठी प्रशासन गेला काही काळ दिवसरात्र मेहनत घेत होते. ईदच्या पूर्वसंध्येला तर कृषीमंत्री दादा भुसे चक्क रात्री सायकलवरुन शहरात फिरून नागरीकांना 'घरातच रहा. बाहेर पडू नका' हे सांगत फिरले. त्यादृष्टीने मुस्लीम समाजबांधवांसाह सगळ्यांसाठी घरातच साजरी केलेली ईद आगळी वेगळी ठरली. 

आजची रमजान ईद कोरोनामुळे एका वेगळ्या वातावरणात होत आहे. त्यात सगळ्यात महत्वाचे असते सामुहिक नमाज (प्रार्थना) आणि जकात (दान). पूर्वसंध्येला आकाशात चंद्र दिसला, की हजारो समाज बांधवांच्या उत्साह व आनंदाला पारावार रहात नाही. सकाळी नवे कपडे परिधान करुन एकमेकांना शुभेच्छा देण्याचे सगळ्यांना वेध लागतात, ईदगाह मैदानावरील सामुहिक प्रार्थनेचे. प्रार्थना संपल्यावर शुभेच्छा देण्यासाठी देखील तेव्हढीच लगबग असते. तेव्हा मैदानावर आमदार, खासदार अन्‌ लहान मोठ्या राजकीय पक्षांचे सर्व नेते जमा होतात. आज यातले काहीच झाले नाही. 

सायकलवरुन फिरत आवाहन करणाऱ्या दादा भुसेंना उस्फूर्त प्रतिसाद

सामुहिक प्रार्थना होऊ नये. घरातच सगळ्यांनी प्रार्थना करुन ईद साजरी करावी यासाठी पोलिस, प्रशासन गेले दिवस काही प्रमुख व्यक्ती, मौलाना, पदाधिकाऱ्यांना सांगत होते. सगळ्यांनी त्याला होकारार्थी प्रतिसाद दिला. मात्र, ऐनवेळी काय होणार याची धास्ती होतीच. त्यामुळे कृषीमंत्री दादा भुसे काल रात्री शहरात संचारबंदी असल्याने स्वतः कोणताही लवाजमा न घेता अगदी साधेपणाने सायकलवरुन शहरात फिरले. दिसेल त्याला शुभेच्छा देत, 'यंदाची ईद घरातच साजरी करा' असे आवाहन ते करीत होते. नागरीकांकडून देखील त्यांना तेव्हढाच उत्साही प्रतिसाद मिळत होता.

जग चंद्रावर पोहोचले तरीही आजही मालेगाव शहरात सामान्यांचे वाहन सायकल हेच आहे. त्यामुळे अगदी दिवंगत समाजवादी नेते निहाल अहमद देखील निवडणुकीचा प्रचार सायकलवरुन करीत असत. मात्र रविवारी ईदच्या पूर्वसंध्येला स्वतः मंत्रीच सायकल फिरून गावात फेरफटका मारीत आहेत. सगळ्यांना घरातच रहा असे आवाहन करीत आहेत. शुभेच्छा देत आहेत, हे अनेकांना आगळे वेगळे वाटले. त्याचा परिणाम देखील आज मालेगाव आणि नाशिक शहरात दिसून आला.

भुसेंची सायकल वारी ठरली आगळी वेगळी

सगळ्यांनी घरीच राहून रमजान ईद साजरी केली. मात्र त्यात उत्साह कमी झालेला नव्हता. अगदी सोशल मिडीयावर देखील शुभेच्छांचा पाऊस पडला होता. त्यात कृषीमंत्री दादा भुसे यांची सायकल वारी आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मिडीयावर शुभेच्छा देत घरीच रहा. आनंदात रहा, या शुभेच्छा वेगळ्या ठरल्या. 

घरातच ईद साजरी करणे ही कल्पना अनेकांच्या सहज पचनी पडणारी नाही याची पोलिसांना कल्पना होती. त्यामुळे काल रात्रीच विविध भागात नाकेबंदी व ईदगाह मैदानाला पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. सकाळी नागरीकांनी या भागात सामुहिक प्रार्थनेसाठी येऊ नये हा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, कोणीच नियमाचे उल्लंघन केले नाही.  त्यामुळे पोलिसांना फारसे काही करावे लागलेच नाही.
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com