कोरोना टेस्टसाठी या माजी मंत्र्यांनी उभारली प्रयोगशाळा - The laboratory was set up by the former Minister of State for Corona Testing | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना टेस्टसाठी या माजी मंत्र्यांनी उभारली प्रयोगशाळा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

प्रयोगशाळेत "कोविड 19'चीही तपासणी अत्यंत कमी दरात केली जाणार आहे. येत्या एक जून पासून ही प्रयोगशाळा सुरू होणार आहे.

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन "जी.एम.फाउंडेशन'च्या माध्यमातून राज्यभरात वैद्यकीय सेवा करीत आहेत. जळगाव शहरात याच फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयोगशाळाच उभारली जात आहे. या प्रयोगशाळेत "कोविड 19'चीही तपासणी अत्यंत कमी दरात केली जाणार आहे. येत्या एक जून पासून ही प्रयोगशाळा सुरू होणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांची वैद्यकीय सेवा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच आहे. ग्रामीण भागातील गरीब जनतेला मुंबईतील चांगल्या रूग्णालयात सेवा देण्यासाठी त्यांची यंत्रणा काम करीत असते. मुंबईत "आरोग्यदूत' म्हणून त्याचे कार्यकर्ते काम करीत आहेत. याशिवाय ग्रामीण भागात तपासणी शिबीर आयोजित करण्यात येते. या ठिकाणी मुंबई, पुणे येथील नामाकिंत डॉक्‍टर येतात, ते रूग्णांची तपासणी करतात शिवाय ज्यांना ऑपरेशनची गरज आहे. त्यांचे ऑपरेशनही केले जाते.

"कोरोना'च्या रूग्णाच्या सरकारतर्फे योग्य उपचार केले जात नसल्याची टिका त्यांनी केली. शिवाय रूग्णाच्या तपासणीचा अहवालही लवकर दिला जात नसल्याची टिका महाजन यांनी केली आहे. मात्र, ते केवळ टिका करून थांबले नाहीत तर त्यांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयास चार व्हेंटीलेटरही भेट दिले आहेत. शिवाय आता त्यांनी जी. एम. फाउंडेशनच्या माध्यमातून जळगावात प्रयोगशाळेची उभारणी केली आहे.

 

अत्यंत माफक दरात सुविधा

जळगाव येथील महापालिकेच्या नानाबाई रूग्णालयात या प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. जी.एम.फाउंडेशन व औरंगाबादच्या ओम साई फाउंडेशन माध्यमातून या प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. याबाबत माहिती देतांना गिरीश महाजन यांनी सांगितले, कि या ठिकाणी कोविड संशयीत रूग्णाचे स्वॅब घेवून ते पुण्याला पाठवून त्यांचे चोवीस तासात अहवाल देण्यात येणार आहे. ही सुविधा अत्यंत माफक दरात असेल. या शिवाय या ठिकाणी इतर रक्त, लघवी तपासणी होईल. सी.टी. स्कॅन, ईको टेस्टही करण्यात येणार आहे. यासाठी खासगी प्रयोगशाळेपेक्षा अत्यंत कमी दर आकारण्यात येईल असेही महाजन यांनी स्पष्ट केले. आज या प्रयोगशाळेच्या कामाची त्यांनी पाहणी केली. येत्या एक जूनपासून ही प्रयोगशाळा सुरू होणार आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख