Khadse expressed this wish to Fadnavis during his Jalgaon tour | Sarkarnama

जळगाव दौऱ्यात फडणवीसांकडे खडसेंनी ही इच्छा व्यक्त केली

कैलास शिंदे : सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 9 जुलै 2020

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यात अंतर्गत वाद आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस आज (ता. 9 जुलै) जळगाव दौऱ्यावर आलेले असताना एकनाथ खडसे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेवू शकले नाहीत. परंतु दोघांनी भ्रमध्वनीवरून राज्यातील काही प्रश्‍नांवर चर्चा केली. 

जळगाव : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यात अंतर्गत वाद आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस आज (ता. 9 जुलै) जळगाव दौऱ्यावर आलेले असताना एकनाथ खडसे यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेवू शकले नाहीत. परंतु दोघांनी भ्रमध्वनीवरून राज्यातील काही प्रश्‍नांवर चर्चा केली. 

देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर आल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेणार काय? याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सर्वांनाच उत्सुकता होता. खडसे यांच्या सून खासदार रक्षा खडसे यांनी फडणवीस यांची जैन हिल्स येथे भेट घेतली. त्यानंतर त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसही उपस्थित होत्या. एकनाथ खडसे मात्र उपस्थित राहू शकले नाहीत. ते शेतात गेलेले असताना त्यांचा पायाला किरकोळ फॅक्‍चर झाले आहे. त्यामुळे त्यांना ट्रॅक्‍शन लावण्यात आल्याने ते भेटू शकले नाहीत. मात्र, खडसे यांनी फडणवीस यांची भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. 

याबाबत खडसे यांच्याशी संपर्क साधला असताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनाला बुधवारी (ता. 8 जुलै) नशिराबाद जवळ अपघात झाल्याचे कळताच आपण त्यांना भ्रमणध्वनी करून विचारपूस केली होती. त्यावेळी त्यांनी सर्व जण सुखरूप असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज (ता. 9 जुलै) सकाळी आपण त्यांच्याशी पुन्हा भ्रमध्वनीवर चर्चा केली. 

जळगाव जिल्ह्यात वरणगाव येथे मंजूर झालेले पोलिस प्रशिक्षण केंद्र स्थलांतरीत करण्यात आले आहे. आपण दोघांनी ते जळगावला मंजूर करून आणले आहे, ते हलविणे योग्य नाही, हा मुद्दा आपण पत्रकार परिषदेत घ्यावा. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून ते जळगाव येथेच ठेवण्यास सांगावे, असेही आपण फडणवीसांना सांगितले. 

सद्यस्थितीत खतांची साठेबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे. आपले सरकार असताना आपण साठेबाजी न होऊ देता शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून देत होतो. या साठेबाजीबाबतही आपण पत्रकार परिषदेत माहिती द्यावी, असेही आपण त्यांना सांगितले असे खडसे म्हणाले. 

त्यावर फडणवीसांनी सांगितले, की आपण सद्यस्थितीत केवळ "कोविड' संदर्भात राज्यात दौऱ्यावर असून त्याच संदर्भात माहिती देत आहोत. परंतु विधानसभेत आपण हे मुद्दे उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या शिवाय त्यांनी आपल्या तब्बेतीचीही विचारपूस केली, अशी माहिती खडसे यांनी दिली. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख