भाष्य करण्यासोबतच पत्रकारांनी दिशा देण्याचे काम करावे

प्रगल्भ लोकशाहीत दबावाविना लोकशाहीतील चौथ्या स्तंभाला काम करता येते. पत्रकारांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र आहे. पण अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील सीमारेषा ओळखता यायला हवी. लोकशाहीला पोषक अशी विश्‍वासार्हता जोपासली जावी.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis

नाशिक : प्रगल्भ लोकशाहीत दबावाविना लोकशाहीतील चौथ्या स्तंभाला काम करता येते. पत्रकारांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र आहे. पण अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील सीमारेषा ओळखता यायला हवी. लोकशाहीला पोषक अशी विश्‍वासार्हता जोपासली जावी. आरजकता हा लोकशाहीला पर्याय असू शकत नाही असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघाच्या पत्रकार दिनानिमित्तच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नागपूरचे अविनाश पाठक यांचा जीवनगौरव, नाशिकमधील ज्येष्ठ संपादक चंदुलाल शाह यांचा उत्कृष्ट लेखणी व ‘सकाळ’चे बातमीदार योगेश मोरे यांचा गौराव करण्यात आला.  

यावेळी फडणवीस म्हणाले,  माध्यमे व पत्रकार यांची लोकशाहीला पोषक अशी विश्‍वासार्हता जोपासण्यात मोठी भूमिका असते. त्यामुळेच लोकशाहीचे संवर्धन व विकास करायचा असेल तर समतोल व प्रबोधनात्मक दृष्टीकोण आवश्यक आहे. त्यातून समाजाला व व्यवस्थेला दिशा मिळते. आरजकता हा लोकशाहीला पर्याय होऊ शकत नाही  म्हणून अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आरजकतेविरुद्ध उभे राहायला हवे. डिजिटल माध्यम आणि सोशल मीडियातून माहिती बाहेर येताना त्याबद्दलची सत्यता पडताळून पाहायला हवी. पूर्वी मुद्रित माध्यमांमध्ये चुकीची माहिती आल्यास त्याबद्दलचा खुलासा द्यावा लागायचा. आता डिजिटल माध्यमात चुकीची माहिती आल्यास ती काढून टाकली जाते. हीच ती संक्रमणावस्था आहे. त्यातून आपल्याला प्रगल्भतेकडे जावे लागेल. भाष्य करण्यासोबत पत्रकारांनी दिशा देण्याचे काम करायला हवे, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी विलास पाटील आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष शशिकांत पगारे यांनी पत्रकारांच्या मागण्या श्री. फडणवीस यांच्यापुढे ठेवल्या. नागपूरचे अविनाश करे, उद्योजिका संपदा हिरे, ग्रामसेवक शेखर घुगे, करण गायकर, अनिल कुंदे, रोहित लढ्ढा, सोनल दगडे आदींचा सन्मान करण्यात आला. याशिवाय पत्रकारांच्या मुलींसाठी सायकली भेट देण्यात आल्या.

यावेळी माजीमंत्री जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, डॉ. राहुल ढिकले, खासदार डॉ. भारती पवार, लक्ष्मण सावजी, पोलिस आयुक्त दीपक पांडे, सरचिटणीस विलास पाटील आदी उपस्थित होते.

जन्मभर नाशिककरांसोबत
मुख्यमंत्री असताना श्री. फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत नाशिकला दत्तक घेत असल्याची घोषणा केली होती. त्याचा उल्लेख त्यांनी स्वतः करत नाशिकसाठी योजना आणल्यात याबद्दल सांगून महाविकास आघाडीच्या काळात रखडलेल्या मेट्रो प्रकल्पाबाबत टीका केला. त्याचबरोबर त्यांनी जन्मभर नाशिककरांसोबत राहू, अशी ग्वाही दिली.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com