खडसेंच्या उपस्थितीत जिल्हा बँकेची सभा अन् सभासदांचे स्पीकरच केले बंद...

जळगाव जिल्हा सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ऑनलाईन घेण्यात आली.
खडसेंच्या उपस्थितीत जिल्हा बँकेची सभा अन् सभासदांचे स्पीकरच केले बंद...
Jalgaon District cooperative banks meeting in presence of Eknath Khadse

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत सभासदांचा आवाज दाबण्यात आल्याची तक्रार सभासदांनी केली. सभासद प्रशांत चौधरी यांनी पीक कर्ज एटीएम द्वारे देऊ नका, अशी मागणी केली असता आपणास बोलू दिले नाही, अशी तक्रार त्यांनी केली. (Jalgaon District cooperative banks meeting in presence of Eknath Khadse)

जळगाव जिल्हा सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ऑनलाईन घेण्यात आली. जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे अध्यक्षस्थानी होत्या. यात १६८ सभासदांनी सहभाग घेतला. ज्येष्ठ संचालक एकनाथ खडसे यावेळी उपस्थित होते. प्रारंभी त्यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. यावेळी काही सभासद बोलण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचा माईक बंद करण्यात आला त्यांना बोलूच देण्यात आले नाही, अशी तक्रार सभासदांनी केली.

माजी संचालक प्रशांत चौधरी यांनी पीक कर्ज वाटप एटीएम द्वारे देण्याचे बंद करावे, असे मत व्यक्त केले. मात्र त्यांना बोलू दिले नाही. याबाबत त्यांनी सांगितले, की बँक पीक कर्ज एटीएमद्वारे देते. मात्र आजच्या स्थितीत अनेक ठिकाणी ते बंद असतात. तसेच अनेक शेतकरी सभासदांना एटीएम हाताळता येत नाही. त्यामुळे त्यांना पैसे काढण्यासाठी अडचण निर्माण होते. परिणामी, पीक कर्ज एटीएमद्वारे न देता ते बँकेतून  द्यावे, अशी आपली मागणी आहे. मात्र हे सुध्दा ऐकून  घेतले जात नाही. 

जिल्हा बँक शेतकऱ्यांची छळवणूक करीत आहे असा आरोपही चौधरी यांनी केला. जिल्हा बँकेच्या सर्वसाधाण सभेचा अजेंडा देण्याची गरज आहे. मात्र सभासदांना हा पाठविण्यात आला नाही. त्यामुळे सभासदांना विषय माहीत नव्हते. सोसायटीला एक अजेंडा पाठविण्यात आला. तेथून माहिती सभासदांनी घेतली असेही त्यानी सांगितले. यावेळी तक्रार करणारे सभासद मनवेल सोसायटी चे चेअरमन कमलाकर पाटील, प्रा. सुभाष पाटील या सभासदांनाही बोलू देण्यात आले नसल्याचे चौधरी यांनी सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष आमदार  किशोर पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, संजय पवार, अॅड. रवींद्र पाटील, नानासाहेब देशमुख, राजेंद्र राठोड, आमदार सुरेश भोळे, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, जिल्हा बँक युनियनचे अध्यक्ष सुनील पवार, हेमंतकुमार साळुंखे , प्रशासन अधिकारी एम. टी. चौधरी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in