पेन्शनमध्ये गेलेल्यांचे कसले टेन्शन? गुलाबराव पाटलांचा राणेंना टोला - Gulabrao Patil Targets Narayan Rane over his remarks on Shivsena | Politics Marathi News - Sarkarnama

पेन्शनमध्ये गेलेल्यांचे कसले टेन्शन? गुलाबराव पाटलांचा राणेंना टोला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

उद्धव ठाकरे हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. काही कारणास्तव ते बाहेर पडले नाहीत म्हणजे त्यांचे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष नाही, असे नाही. ते दररोज नियमितपणे जनतेच्या प्रश्नांचा आढावा घेतच असतात. याउलट माझे असे म्हणणे आहे, की भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा मागच्या कर्जमाफीचा हिशेब द्यावा, अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली

जळगाव : भाजपचे खासदार नारायण राणे सातत्याने शिवसेनेवर टीका करत असतात. जळगावात काल बोलताना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. 'जे पेन्शनमध्ये गेले त्यांचे टेन्शन काय घ्यायचे,' अशी विचारणा करत पाटील यांनी राणे यांची खिल्ली उडवली. भाजपने आधीच्या कर्जमाफीचा हिशेब जनतेला द्यावा, मगच मुख्यमंत्र्यांवर टीका करावी, असे खुले आव्हानही पाटील यांनी भाजपला उद्देशून केले.

पाळधी (ता.धरणगाव) येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आयोजित खानदेश विभागस्तरीय विचारविनिमय व पदनियुक्ती सोहळा मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘भाजप’ कडे आता कोणत्याही प्रकारचा मुद्दा उरलेला नाही. म्हणून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करत आहेत. पण त्यांना शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे, हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो, असे ते म्हणाले.

''कोरोनानंतर आता राज्यात अतिवृष्टीचे संकट उभे राहिलेले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका भाजपकडून होत आहे. या टीकेला उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले, ''उद्धव ठाकरे हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. काही कारणास्तव ते बाहेर पडले नाहीत म्हणजे त्यांचे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष नाही, असे नाही. ते दररोज नियमितपणे जनतेच्या प्रश्नांचा आढावा घेतच असतात. याउलट माझे असे म्हणणे आहे, की भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा मागच्या कर्जमाफीचा हिशेब द्यावा,'' असेही पाटील म्हणाले. 

''तेव्हा कर्जमाफी करताना त्यांनी कर्जाची परतफेड नियमितपणे करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. हे अनुदान शेतकऱ्यांना दिले का? शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिली का? हे आधी देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे. आम्ही सत्तेत आल्यानंतर जशी कर्जमाफी दिली, तशी त्यांनी दिली नाही. प्रोत्साहनपर अनुदानाचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांचा किती कळवळा आहे, हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे भाजप नुसते राजकारण करत आहे,'' असा आरोप त्यांनी केला. 

...म्हणून पवार शेताच्या बांधावर गेले..
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शेताच्या बांधावर जावे लागते, हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे, अशी टीका भाजपकडून झाली होती. त्यावर मंत्री पाटील म्हणाले, ''शरद पवार हे राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. केंद्रीय कृषिमंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. आज त्यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार हे शेतकऱ्यांच्या भरवशावर निवडून येतात. शेतकऱ्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला आहे. शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी ते शेतीच्या बांधावर जाणार नाहीत तर मग काय बंगल्यात बसून राहतील का?''
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख