गुलाबरावांनी करून दाखविले : पोलिस प्रशिक्षण केंद्र जळगावमध्येच 

राज्य राखीव दलाच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेवरून जळगाव आणि नगर जिल्ह्यात जोरदार घमासान सुरू आहे. गेल्या महिन्यात नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्‍यातील कुडसगाव येथे हे प्रशिक्षण केंद्र स्थलांतरीत करण्यास राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. मात्र, आता हा अध्यादेश रद्द करून हे प्रशिक्षण केंद्र जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथेच करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Gulabrao did it: Police training center in Jalgaon itself
Gulabrao did it: Police training center in Jalgaon itself

जळगाव : राज्य राखीव दलाच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेवरून जळगाव आणि नगर जिल्ह्यात जोरदार घमासान सुरू आहे. गेल्या महिन्यात नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्‍यातील कुडसगाव येथे हे प्रशिक्षण केंद्र स्थलांतरीत करण्यास राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. मात्र, आता हा अध्यादेश रद्द करून हे प्रशिक्षण केंद्र जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथेच करण्यास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. 

याबाबत माहिती देताना मंत्री पाटील यांनी सांगितले, की भुसावळ तालुक्‍यातील हतनूर-वरणगाव येथील राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र जामखेड तालुक्‍यात स्थलांतरित करण्याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली. हे प्रशिक्षण केंद्र जळगाव जिल्ह्यातील हतनूर येथेच ठेवावे. कोणत्याही परिस्थितीत ते हलवू नये, अशी मागणी केली. त्यानंतर लागलीच आज (ता. 9 जुलै) वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यास भाग पाडले. यात एसआरपीएफ 1303 हे प्रशिक्षण केंद्र हतनूर-वरणगाव येथेच होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

याबाबत प्रारंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे केंद्र वरणगाव येथेच असावे, अशी मागणी करणारे निवेदन पत्र दिले. या अनुषंगाने बुधवारी (ता. 8 जुलै) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आज (ता. 9 जुलै) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे उपस्थित करून याबाबत चर्चा केली. 

आमच्यात काम धरण्याची धमक : पाटील 

या निर्णयाबाबत मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र हे हतनूर-वरणगाव येथेच होणार असल्यामुळे विरोधकांना मोठी चपराक बसली आहे. आमच्यात काम करण्याचा दम आणि धमकसुद्धा आहे. ज्यांना गेल्या 25 वर्षांत या केंद्राची एक वीटसुद्धा उभारता आली नाही, ते आमच्यावर टीका करत होते. मात्र, आम्ही शाब्दीक वादात न पडता थेट करून दाखविले. आगामी अधिवेशनात या केंद्राला प्रशासकीय मान्यता मिळणार असून दोन वर्षांत हे केंद्र पूर्णत्वाकडे येणार असल्याचे आमचे वचन आहे. जिल्ह्याचा पालक म्हणून आम्ही आमच्या कर्तव्याचे पालन करत आहोत. विरोधकांकडे बोंब ठोकण्याशिवाय काहीही उरले नसल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. 

प्रशिक्षण केंद्रांचे आजपर्यंतचे निर्णंय 

1) शासन निर्णय ता. 26/10/1994 नुसार वरणगाव येथे नवप्रविष्ठ पोलिस शिपाई यांना मुलगामी प्रशिक्षण देण्यासाठी नवीन पोलिस प्रशिक्षण शाळा (केंद्र) सुरू करण्यास तत्वत: मान्यता. 
2) या केंद्रासाठी हातनूर-वरणगाव परिसरातील 22 हेक्‍टर 94 आर जमीन पोलिस विभागाच्या ताब्यात देण्यात आली. 
3) ता. 23/3/1999 रोजी निधी मागणीचा सुधारीत प्रस्ताव सरकारला सादर केला होता. मात्र या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यताच नसल्याने 10 कोटी निधी मागणीचा प्रस्ताव पोलिस महामंडळाच्या संचालकांच्या बैठकीत रद्द. 
4) ता. 17/02/2010 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरणगाव येथे नवीन पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास तत्वत: मान्यत. 
5) ता. 06/04/2010 रोजी प्रधान सचिव मेधा गाडगीळ यांचे अतिरिक्त पोलिस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांना नवीन पोलिस प्रशिक्षण विद्यालयाच्या बांधकाम, साहित्य व साधन सामुग्री प्रस्ताव सरकारला सादर करण्याचे निर्देश. 
6) ता. 14/02/2011 रोजी अतिरिक्त पोलिस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालयाकडून 62.67 कोटी रूपये खर्चाचा सविस्तर प्रस्ताव सरकारला सादर. 
7) पोलिस महासंचालक, ता. 26/10/2016 अन्वये व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य पोलिस गृह निर्माण व कल्याण महामंडळ मर्या. वरळी-मुंबई यांना विद्यमान पोलिस प्रशिक्षण विद्यालय ही नवीन पोलिस शिपाई यांना प्रशिक्षण देण्यास सक्षम असून वरणगाव येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र तयार करण्याची आवश्‍यकता नाही, असा प्रस्ताव सादर. 
8) याबाबत विधानसभा अतारांकित प्रश्न क्रमांक 67621 अन्वये वरणगाव येथील नियोजित पोलिस प्रशिक्षण केंद्रबाबत प्रश्न, 
9) जळगाव जिल्हा हा अतिसंवेदनशील असून येथे नेहमी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी वरणगाव येथे पोलिस प्रशिक्षण केंद्राएवजी SRPF ग्रुप उभारल्यास कायदा व सुव्यवस्थेच्या वेळी तत्काळ उपलब्ध होऊ शकतो, असे लेखी निवेदन सादर. 
10) ता. 13/09/2019 च्या सरकारी निर्णयानुसार पोलिस प्रशिक्षण केंद्राऐवजी SRPF ग्रुप (राज्य राखीव पोलिस बल गट क्र.19) स्थापन करण्यास तत्वत: मान्यता. 
11) ता. 26/06/2020 सरकारी निर्णयानुसार राज्य राखीव पोलिस बल गट क्र.19 हातनूर-वरणगाव येथे स्थापन करण्याऐवजी मंजूर पदांसह व मंजूर आवर्ती/अनावर्ती खर्चासह कुसडगाव ता. जामखेड जि. नगर येथे स्थापन करण्यास मान्यता. 
12) ता. 9/7/2020 राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक प्रशिक्षण केंद्र हतनूर-वरणगाव येथे स्थापन करण्याबाबत पोलिस उच्चस्तरीय बैठकीत निर्णय. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com