गिरीश महाजन उधळणार खडसे आणि गुलाबराव पाटलांचा `प्लॅन`

एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला यश मिळू शकते ही ताकद पक्ष दाखवू शकतो असा संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
गिरीश महाजन उधळणार खडसे आणि गुलाबराव पाटलांचा `प्लॅन`
Eknath Khadse & Girish Mahajan .jpg

जळगाव :  जळगाव जिल्हा सहकारी बँक (Jalgaon district co-oprative Bank) निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय समितीत भाजप (BJP) असला तरी आपले वेगळे अस्तित्व दाखविण्यासाठी त्यांनी लढण्याची तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यात सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र एकनाथ खडसे  (Ekanath Khadse) भाजप मध्ये असताना  गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते. आता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. राज्यात पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे ही बँक आयतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येईल, अशी अपेक्षा पक्षाचे नेते करीत आहे. मात्र,  तरीही निवडणुका टाळून बिनविरोध निवडणूक करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत, त्यासाठी एक सर्व पक्षीय बैठकही नुकतीच घेण्यात आली, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan), शिवसेनेचे नेते मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), काँग्रेस पक्षाचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Ulhas Patil) यांच्यासह सर्वच पक्षाचे काही नेते उपस्थित होते.

या बैठकीत निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय आठ जणांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यात प्रत्येक पक्षाचे दोन सदस्य आहेत. ही समिती बैठक घेऊन बिनविरोध बाबत निर्णय घेणार आहे. मात्र, या समितीची अद्याप एकही बैठक झाली नसतांना, दुसरीकडे भाजप मात्र आपली बँक निवडणुकीसाठी रणनीती आखण्याच्या तयारीत लागला आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन हे स्वतः जिल्ह्यात काही ठिकाणी बैठका घेऊन आपल्या पक्षातील लोकांची मते जाणून घेत असताना भाजपचे स्वतंत्र लढण्याची तयारी केल्यास त्यासाठी उमेदवारांची चाचपणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

बँक निवडणूक बिनविरोध झाल्यास भाजपला अनेक तुटी होतील, शिवाय गेल्या वेळी बिनविरोध निवडणूक करून ही ठरल्याप्रमणे काही वचने पाळली नाहीत, अशा तक्रारी आहेत. बँकेचे उपाध्यक्ष दरवर्षी बदलण्यात येईल असे सांगण्यात आले होते. याबाबत एकनाथ खडसे यांनी आश्वासन दिले होते, मात्र, तब्बल पाच वर्ष बदल केलाच गेला नाही. त्यामुळे यावेळी अशी आश्वासने पाळली जाईल याची खात्री काय? अशी शंकाही उपस्थित करण्यात आहे. तसेच, निवडणूक  बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांचे प्रत्येकी सहा आणि काँग्रेस पक्षाचे तीन असे संचालक घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल असे सांगण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस त्यास तयार होणार नाही, ते जास्त जागा मागतील. शिवाय आज भारतीय जनता पक्षाचे सहा सदस्य आहेत. तेवढया जागा मिळतील काय? अश्या अनेक शंका कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.

भारतीय जनता पक्षाची जिल्ह्यात सहकार क्षेत्रात ताकद आहे. त्यामुळे ती दाखवून देण्यासाठी स्वतंत्र लढून आपली ताकद दाखवावी. संपूर्ण जागा लढविण्यास नऊ जागा निवडून येण्याची खात्री पक्षाला आहे. या शिवाय या निवडणुकीच्या विरोधाचा फायदा आगामी जिल्हा परिषद, तसेच, पालिका निवडणुकीत भाजपला होईल आपण महविकास आघाडीच्या विरोधात आहोत, हा संदेश देखील जनतेत जाईल. यामुळे कार्यकर्तेही जोशात लढण्यास सज्ज होतील, त्याचा फायदा यश मिळविण्यात होइल, असे मतही  भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला यश मिळू शकते ही ताकद पक्ष दाखवू शकतो.

त्यामुळे पक्षाने बँकेपासून स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी केली पाहिजे, असेही मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले असल्याचे सांगण्यात येत आहे. गिरीश महाजन यांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केली असून जिल्हा बँकेचे संचालक व जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू महाजन यांच्या फार्म हाऊसवर बैठकीची झालेली चर्चा आता समोर येत आहे. या बैठकीला भाजपचे अनेक जिल्हयातील नेते उपस्थित होते, असे सांगितले जात आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in