काय करावे बुवा...गेंड्याच्या कातडीचे सरकार काही ऐकतच नाही : महाजन 

राज्यातील हे सरकार जनतेसाठी काहीच करीत नाही. त्यांच्याविरुद्ध आंदोलन केले तरी त्यांना कोणताही फरक पडत नाही. अक्षरश: गेंड्याच्या कातडीचे असलेल्या या सरकारबाबत काय करावे? असा प्रश्‍न पडला आहे.
Former Minister Girish Mahajan criticizes the state government
Former Minister Girish Mahajan criticizes the state government

जळगाव : "सहकारी बॅंकामध्ये ठेवी ठेवू नका, असा आदेश सरकार काढते. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. कोरोनाच्या रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत नाही. शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळत नाही, बियाणे मिळाले तर बोगस दिली जातात. विजेचा लंपडाव सुरू आहे.

राज्यातील हे सरकार जनतेसाठी काहीच करीत नाही. त्यांच्याविरुद्ध आंदोलन केले तरी त्यांना कोणताही फरक पडत नाही. अक्षरश: गेंड्याच्या कातडीचे असलेल्या या सरकारबाबत काय करावे? असा प्रश्‍न पडला आहे,' अशी व्यथा राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. 

राज्य सरकारच्या कारभारावर आसूड ओढत माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले, राज्यात जनतेने भाजप शिवसेना युतीला निवडून दिले होते. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा जनतेला हवे होते. परंतु शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत सरकार स्थापन केले. आता सरकार स्थापन केले, त्याबाबत भाजपचे काहीही म्हणणे नाही. परंतु सत्तेवर आला आहात, तर जनतेसाठी काम तरी करा. परंतु हे सरकार काहीच करीत नाही. 

राज्यात सहकार आम्ही मोडीत काढला, असा आरोप युती सरकार असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले आमच्यावर करीत होते. मात्र, आता त्यांनीच मंत्रिमंडळात निर्णय घेऊन सहकारी बॅंकेत शासकीय निधीच्या ठेवी ठेवू नयेत, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे सहकार कोण संपवायला निघाले, हे समोर दिसतेच आहे. 

शेतकरी आज कर्ज मागतोय; परंतु त्याला कर्जसुद्धा हे सरकार देत नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर आम्ही खते देऊ, असे जाहीरपणे त्यांनी सांगितले; परंतु आज शेतकऱ्यांना रांगेत उभे राहूनही खते मिळत नाहीत. बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध केले. मात्र, ते उगवलेच नाही. मका, कापूस खरेदी करण्याची घोषणा केली; परंतु प्रत्यक्षात अद्यापही खरेदी झालीच नाही. 

केळी उत्पादकांच्या पीक विम्यात अनेक निकष लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा विमा शेतकऱ्यांसाठी आहे की विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे. हेच कळत नाही, त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. आमच्या सरकारच्या काळात आम्ही राज्यातील शेतकऱ्यांचा मका आणि कापूस पूर्णपणे खरेदी केला होता. 

राज्यात कोविड रुग्णांची संख्या वाढतेय, उपचाराच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र त्यात सुधारणा करण्यास हे सरकार तयार नाही. मुख्यमंत्र्यांसह यांचे सर्व मंत्री केवळ घरात बसून आहेत. हे सरकार कोणत्याही बाबतीत काम करण्यास तयार नाही. या सरकारला आम्ही आमदार म्हणून सूचना केल्या, मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, मंत्र्यांना पत्र दिले; परंतु ते ठिम्मच आहे. त्यांच्या विरोधात राज्यात आंदोलन करून निवेदन दिले, तरीही काहीही हालत नाही. त्यामुळे आता या ठिम्म सरकारचे करायचे काय, हाच खरा प्रश्‍न आहे, असे महाजन म्हणाले.  

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com