एकनाथ खडसे म्हणतात, भाजपच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीस शुभेच्छा ! 

भारतीय जनता पक्षाच्या नवीन प्रदेश कार्यकारिणीत आपले विशेष निमंत्रितपद कायम आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकारी व सदस्यांना पुढील कार्यासाठी आपल्या शुभेच्छा आहेत.
Congratulations from Eknath Khadse to the new BJP state executive
Congratulations from Eknath Khadse to the new BJP state executive

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या नवीन प्रदेश कार्यकारिणीत आपले विशेष निमंत्रितपद कायम आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकारी व सदस्यांना पुढील कार्यासाठी आपल्या शुभेच्छा आहेत, असे मत भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 3 जुलै रोजी प्रदेशची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीमध्ये एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना प्रथमच चिटणीस पदावर नियुक्त करण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांची विशेष निमंत्रितपदावरील नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. 

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत प्रथमच एका घरातील दोन प्रतिनिधी नेमण्यात आलेले आहेत. मात्र, तरीही खडसे यांना डावलले असून ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. 

याबाबत एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपल्याला पक्षाने कार्यकरिणीत डावलेले नाही. प्रदेश कार्यकारिणीत आपण सरचिटणीस पदावर 13 वर्षे होतो, त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून प्रदेश कार्यकारिणीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून मी कार्यरत आहे. आताही नवीन प्रदेश कार्यकारिणीत आपण विशेष निमंत्रित आहोत. त्यामुळे आपण या कार्यकारिणीत होतो, त्याच पदावर कायम आहोत. आपल्याला डावलण्याचा कोणताही प्रश्‍न नाही. त्यामुळे आपण नाराज असण्याचा कोणताही प्रश्‍न नाही. 

प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला आपण विशेष निमंत्रित म्हणून मार्गदर्शन करावयास जात होतो, आताही त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांना यापुढेही मार्गदर्शन करत राहणार आहे. पक्षाच्या वाढीसंदर्भात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत. 

खडसे यांच्या सून व रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांनाही प्रदेश कार्यकारिणीमध्ये चिटणीस पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यांचा प्रथमच प्रदेश कार्यकारिणीत सामवेश करण्यात आला आहे. 

त्यांच्या निवडीबाबत एकनाथ खडसे म्हणाले, खासदार रक्षा खडसे यांनी पक्षीय पातळीवर जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे त्यांना प्रदेश पातळीवर पक्षाने काम करण्याची संधी दिली आहे. त्या ठिकाणीही त्या अंत्यत चांगल्या पद्धतीने पक्षासाठी कार्य करून आपल्या कामाची छाप उमटवतील, असा मला विश्‍वास आहे. त्यांनाही आपल्या या प्रदेश पातळीवर काम करण्यासाठी शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर फडणवीस, पाटलांचा वरचष्मा 

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी 3 जुलै रोजी प्रदेश कार्यकारिणीची जंबो यादी जाहीर केली. या संपूर्ण कार्यकारिणीवर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांचेच वर्चस्व असल्याचे दिसून येते. फडणवीस आणि पाटील यांनी तयार केलेला हा चमू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून पक्षावर नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना नव्या कार्यकारिणीत संधी देण्यात आलेली नाही. नाही म्हणायला खडसे यांचे विशेष निमंत्रित सदस्यांच्या यादीतील स्थान कायम ठेवण्यात आले आहे. तसेच, त्यांचा स्नूषा खासदार रक्षा खडसे यांची चिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. हीच खडसे यांच्या दृष्टीने काहीशी जमेची बाजू म्हणता येईल. दुसरीकडे, पंकजा मुंडे यांना केंद्राच्या पातळीवर मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांना काय पद मिळते, हे पाहावे लागेल. 

विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारीबाबत अन्याय होत असलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मात्र दिल्लीची फारशी फिकीर न करता चिटणीसपदी नेमण्यात आले आहे. त्यांचे जवळचे सहकारी विश्वास पाठक यांना माध्यम प्रमुख नेमण्यात आले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com