तुरुंगातून लढवली निवडणूक आणि चक्क जिंकलाही... - Candidate in Jalgaon Won Gram Panchayat Election while in Jail | Politics Marathi News - Sarkarnama

तुरुंगातून लढवली निवडणूक आणि चक्क जिंकलाही...

दिलीप वैद्य
मंगळवार, 19 जानेवारी 2021

रावेर शहराजवळच असलेल्या बक्षीपूर येथील रहिवासी स्वप्नील मनोहर महाजन या युवकाला मार्च महिन्यात झालेल्या रावेर येथील जातीय दंगलीत पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली होती. त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी नाशिक तुरुंगात केली होती. सध्याही तो तुरुंगातच आहे. 

रावेर,(जि.जळगाव) :  तालुक्यातील बक्षीपूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दुसऱ्या प्रभागातून स्वप्नील मनोहर महाजन हा युवक उमेदवार नाशिक येथील तुरुंगात असताना देखील प्रचंड मतांनी विजयी झाला आहे.

रावेर शहराजवळच असलेल्या बक्षीपूर येथील रहिवासी स्वप्नील मनोहर महाजन या युवकाला मार्च महिन्यात झालेल्या रावेर येथील जातीय दंगलीत पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली होती. त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी नाशिक तुरुंगात केली होती. सध्याही तो तुरुंगातच आहे. 

दरम्यान, गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याच्या समर्थकांनी त्याची उमेदवारी दाखल केली. त्यासाठी नाशिक येथे जाऊन समर्थकांनी त्याचा ऑनलाईन उमेदवारी अर्ज सादर केला होता. त्याच्याविरुद्ध गावातीलच संदीप महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काल सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर स्वप्नील महाजन याला २९१ आणि प्रतिस्पर्धी संदीप महाजन याला अवघी ७७ मते मिळाल्याचे व स्वप्नील महाजन हा २१४ मताधिक्याने विजयी झाल्याचे आढळून आले.

निवडणुकीत स्वतः मतदान न करता आणि स्वतः प्रचार न करता तुरुंगात राहून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्याचे राज्यातील हे आगळे वेगळे उदाहरण असावे. दंगलीतील अन्य चार संशयित आरोपींची एमपीडी कारवाईतून औरंगाबाद उच्च न्यायालयाने नुकतीच मुक्तता केली आहे.

त्यांच्यावरील एमपीडीए कारवाईचा आदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे मात्र स्वप्नील महाजन याने अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल न केल्याने तो अद्यापही तुरुंगात आहे. त्याच्यासोबतच्या चौघांची मात्र सुटका झाली आहे. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख