गृहमंत्री अनिल देशमुख अन्‌ एकनाथ खडसेंमध्ये गुफ्तगू? - Anil Deshmukh and BJP Leader Ekanath Khadse secret Meeting | Politics Marathi News - Sarkarnama

गृहमंत्री अनिल देशमुख अन्‌ एकनाथ खडसेंमध्ये गुफ्तगू?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

बोरखेडा येथील पीडितांच्या परिवाराला भेट देऊन काल जळगावकडे निघालेले गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वाहन रावेर शहराबाहेर बिजासनी माता मंदिराजवळील ढाब्याजवळ येताच त्या ठिकाणी थांबलेले माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात सुमारे पाच मिनिटे चर्चा झाली. 

रावेर  : बोरखेडा येथील पीडितांच्या परिवाराला भेट देऊन काल जळगावकडे निघालेले गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वाहन रावेर शहराबाहेर बिजासनी माता मंदिराजवळील ढाब्याजवळ येताच त्या ठिकाणी थांबलेले माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात सुमारे पाच मिनिटे चर्चा झाली. 

खडसे यांच्या गाडीचा चालकही तिथे उपस्थित नव्हता. यामुळे दोघांमध्ये काय बोलणे झाले हे कोणालाही कळले नाही. मात्र देशमुख यांच्या बरोबर असलेले सर्व कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांचा ताफा आणि खडसे यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते लांब उभे राहून त्यांच्या दोघांमध्ये सुरू असलेल्या चर्चेबद्दल तर्क-वितर्क लढवीत होते.

नवरात्राच्या पहिल्याच दिवशी बिजासनी देवीच्या साक्षीने या दोघांमध्ये हे काय गुफ्तगू झाले, हे नवरात्राच्या अखेरच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सर्वांसमोर येईल, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. दरम्यान नाथाभाऊंचा राष्ट्रवादीत प्रवेश नक्की असून त्यांनी भाजप मधील कार्यकर्त्यांना ‘राम राम’ करणे सुरू केले आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. दोघांमधील चर्चा  देशमुख ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापर्यंत पोचविणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

त्या आधी खडसे येथील नव्या विश्रामगृहात देशमुख यांची वाट पाहत होते. देशमुख यांनी खडसे आणि आमदार शिरीष चौधरी यांना आपल्या गाडीत घेतले. बोरखेडा येथील घटनास्थळ आणि वसतिगृहात पीडिताच्या पालकांशी भेटताना तिघेही एकाच गाडीत होते, पण परत जाताना खडसे आपल्या गाडीत बसले आणि ही गुफ्तगू झाली.

दरम्यान, खडसे हे घटस्थापनेच्या दिवशी  (ता. १७) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र खडसे यांनीच दोन दिवसांपूर्वी याबाबत नकार दिला होता. जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते की , राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत आपण कोणताही मुहूर्त सांगितला नाही. हे सर्व मुहूर्त माध्यमांनी काढले आहेत. या प्रवेशाच्या बाबत मला काहीही बोलावयाचे नाही. त्याबाबत आपले `नो कॉमेंट्स` असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख