यवतमाळ जिल्हा बॅंकेच्या निवडणूक प्रचाराला वेग; महाविकास आघाडी, भाजप पॅनेलकडून तयारी - Yavatmal District Bank Campaign getting Momentum | Politics Marathi News - Sarkarnama

यवतमाळ जिल्हा बॅंकेच्या निवडणूक प्रचाराला वेग; महाविकास आघाडी, भाजप पॅनेलकडून तयारी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

गेल्या पाच महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत. आता महाविकास आघाडी, भारतीय जनता पक्ष व तिसऱ्या आघाडीतील संभाव्य उमेदवारांनी गाठीभेटी घेऊन बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

यवतमाळ  : गेल्या पाच महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत. आता महाविकास आघाडी, भारतीय जनता पक्ष व तिसऱ्या आघाडीतील संभाव्य उमेदवारांनी गाठीभेटी घेऊन बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

कर्जवाटप, साहित्य खरेदी, नोकरभरती, विविध निविदा, भाड्याची वाहने आदी माध्यमांतून वार्षिक कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत एंट्री करण्यासाठी भाजप इच्छुक आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना बॅंकेत प्रवेश करणार आहे. बॅंक आपल्या ताब्यात राहावी, यासाठी महाविकास आघाडी व भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राज्यात सत्ता समीकरण बदलल्यानंतर भाजपला यावेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचा सामना करावा लागणार आहे. 

तब्बल १२ वर्षांनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एकूण २१ संचालकांच्या पदांसाठी निवडणूक होणार आहे. गेल्या २६ मार्चला निवडणूक होऊ घातली होती. मात्र, कोरोनामुळे निवडणूक स्थगित करण्यात आली. जिल्ह्याच्या राजकारणाच्यादृष्टीने शेतकऱ्यांची ही बॅंक व त्यावरील सत्ता महत्त्वाची आहे. विद्यमान संचालकांनी ही सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून, आता निवडणुकाही घेतल्या जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेची स्थगित झालेली निवडणूक येत्या डिसेबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. 

भेटी-गाठींवर भर

परिणामी महाविकास आघाडी, भाजप व तिसऱ्या आघाडीकडून लढणाऱ्या उमेदवारांनी प्रचार मोहीम सुरू केली आहे. प्राधिकरणाकडून अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुकीत खरी रंगत येणार आहे. तोपर्यंत मात्र, उमेदवारांनी भेटीगाठी घेण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. सहकार निवडणूक प्राधिकरणाने मतदार व मतदान केंद्र निश्‍चित केलेली आहेत. जिल्ह्यातील एक हजार ४५ मतदार हे २९ मतदान केंद्रांवर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

वणी लोकसभा क्षेत्रात बैठका

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बैठकांवर भर दिला आहे. शुक्रवारी (ता.२० ) पांढरकवडा, घाटंजी भागात नेत्यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. त्यानंतर शनिवारी (ता.२१) वणी व लगतच्या परिसरातील मतदार व नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. जिल्हा गटातून लढणाऱ्या नेत्यांनी प्रचाराची मोहीम सुरू केली आहे.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख