who is keeping an eye on the chair by sending the chief minister to delhi | Sarkarnama

`मुख्यमंत्र्यांना दिल्लीला पाठवून कुणाची नजर आहे त्या खुर्चीवर ?`

मिलींद उमरे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यात महाराष्ट्राचे तीनचाकी सरकार अपयशी ठरत आहे. भांबावलेले सरकार कसलेही उरफाटे निर्णय घेत आहे. अजूनही मुख्यमंत्रिपदाच महत्त्व आणि त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना पूर्ण माहीत झालेली नाही.

सिरोंचा (जि. गडचिरोली) : मुख्यमंत्रिपदाच महत्त्व आणि त्याची जबाबदारी अजूनही मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे समजलेली नाही. त्यातच मुख्यमंत्र्यांना केंद्रात नवी भूमिका वठवण्याचा सल्ला 'सामना' दैनिकातून देण्यात आला आहे. असा सल्ला देणे, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना दिल्लीला पाठवून आतमधल्या कुणाची तरी त्या पदावर नजर आहे. यात काही तरी गडबड असल्याचा संशय मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. इतर कामासाठी आपापसात भांडणाऱ्या मंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही, अशी घणाघाती टीकाही सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

देशातील काही राज्यांनी मंदिरे सुरू केली. मात्र, महाराष्ट्रात मंदिराऐवजी दारू दुकाने सुरू झाली आहेत. राज्य सरकारला लॉकडाऊनच्या काळात मंदिराऐवजी दारू दुकाने सुरू करायची गरज वाटली. दारूच्या दुकानात कोरोना येत नाही, असे बहुदा राज्य सरकारला वाटत असावे. हे सरकारचे नवे विज्ञान असावे, अशी उपरोधक टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर राज्यात मंदिरे बंद करून मदिरालये सुरू ठेवणे, हे कसले धोरण आहे ? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

मुनगंटीवार यांनी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील सिरोंचातील प्रसिद्ध कालेश्वर मंदिरात सपत्नीक जाऊन दर्शन घेतले. यावेळी तेलंगणाच्या भाजप पदाधिकाऱ्यांसह माजी आमदार पट्टा मधू यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत केले. सुधीर मुनगंटीवार यांनी नंतर सिरोंचाला भेट देऊन भाजप पदाधिकाऱ्यांशी पक्ष संघटन व परिसरातील नागरिकांच्या समस्यांवर चर्चा केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातली मंदिरे सुरू करण्याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. परंतु, त्यांनी विशेष प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना मंदिराऐवजी मदिरेचा विषय जास्त आवडत असल्याचे दिसून येते आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यात महाराष्ट्राचे तीनचाकी सरकार अपयशी ठरत आहे. भांबावलेले सरकार कसलेही उरफाटे निर्णय घेत आहे. अजूनही मुख्यमंत्रिपदाच महत्त्व आणि त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना पूर्ण माहीत झालेली नाही. इतर कामासाठी आपापसात भांडणाऱ्या मंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे.  (Edited by : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख