बावनकुळेंना काळे धंदे भोवले : वडेट्टीवारांचा पलटवार - Vijay Vadettiwar Answers Chandrashekhar Bawankule Allegations | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

बावनकुळेंना काळे धंदे भोवले : वडेट्टीवारांचा पलटवार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना जिल्ह्यातील अवैध व्यवसायावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. दुसरीकडे वडेट्टीवार यांनी बावनकुळे मंत्री असताना केलेल्या कामांची आठवण करून देत तुमच्या काळ्या धंद्यांमुळेच पक्षाने तुमचे तिकीट कापले असा पलटवार केला. 

चंद्रपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता दारू आणि वाळू तस्करीवरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणे सुरू आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना जिल्ह्यातील अवैध व्यवसायावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. दुसरीकडे वडेट्टीवार यांनी बावनकुळे मंत्री असताना केलेल्या कामांची आठवण करून देत तुमच्या काळ्या धंद्यांमुळेच पक्षाने तुमचे तिकीट कापले असा पलटवार केला. 

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी  पदवीधरांच्या प्रश्‍नांवर बोलण्याऐवजी जिल्ह्यातील वाळू आणि दारू तस्करीच्या अनुषंगाने वडेट्टीवारांवर तोफ डागली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हे वाटून घेतले आहे. वाळू तस्करीचे अलिखित आदेश दिले. कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवायच्या नाही, असा दम जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना दिला आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

"'दारूबंदीचा निर्णय झाला. परंतु, सध्या कठोर अंमलबजावणी होत नाही. बाटली मागे नेते कमिशन घेत आहेत. दारूबंदी उठविता येणार नाही. ते उठविण्याचे पाप करू नये. मात्र, राज्यात दारूबंदीच्या समर्थनार्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. युती शासनाच्या काळात दारूबंदीसाठी कडक कायदे केले. परंतु, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दारूतस्करांना खुली सूट मिळाली आहे," असेही बावनकुळे म्हणाले होते.

याला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, ''बावनकुळे मंत्री असताना केलेले धंदे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना माहित आहे. त्यामुळेच त्यांचे तिकीट कापले. माझ्यावर केलेले आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावे. सत्ता गेल्यानंतर भाजपचे नेते वायफळ बडबड करीत आहे. लोकांची दिशाभूल करणे, हाच एकमेव उद्योग सध्या त्यांच्याकडे आहे. कोराडी येथील जगदंबा ट्रान्स्पोर्ट आणि जगदंबा कन्स्ट्रक्‍शन कुणाची आहे? त्यांना वाळूचा पुरवठा कुणाकडून होतो, याची माहिती बावनकुळेंना असेल,'' 

"युती शासनाच्या काळात अवैध धंदे सुरू होते. स्वत: भाजप नेते दारू आणि वाळूच्या तस्करीत गुंतले होते. आम्ही स्वत: दारू सुरू करण्याची मागणी करीत आहे. आजही मूल आणि पोंभुर्णा येथील वाळूघाटांतून तस्करी सुरू आहे. ते माणसे कुणाची आहे. बावनकुळेंनी याची माहिती घ्यावी," असे आव्हानही  वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांना उद्देशून दिले.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख