तुकाराम मुंढे म्हणाले, ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्या

रुग्ण उपचारासाठी जर एखाद्या खाजगी रुग्णालयात गेल्यास कायद्यान्वये त्या रुग्णालयाने त्याची माहिती मनपाला देणे आवश्यक आहे. शहरातील कोव्हिडच्या संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी या सर्व दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करून योग्य कार्यवाही करणे हे प्रत्येक झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर : कोरोना पाझिटिव्ह रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत आहे. ही वाढ अशीच होत राहीली तर शहर समूह संसर्गाच्या दिशेने जायला वेळ लागणार नाही. आत्ताच सावध होण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व झोनल वैद्यकिय अधिकारी आणि त्यांच्या टिमने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, असे निर्देश महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.

शहरात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामधील बहुतांश रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. मात्र या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क’ व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आणि मृत पावलेले कोरोनाग्रस्त रुग्ण यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधणे, याला प्राधान्य असायला हवे. यादृष्टीने सर्वच झोनल वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमूने काटेकोरपणे कार्यवाही करावी, असे आयुक्त मुंढे म्हणाले.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील ‘कोरोना वॉर रूम’मध्ये झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, प्रभारी उपायुक्त अमोल चौरपगार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

मुंढे म्हणाले, कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे व त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. एका व्यक्तीच्या संपर्कातील किमान २० जणांचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची चाचणी करण्यात यावी. चाचणीत संपर्कातील व्यक्ती पॉझिटिव्‍ह आल्यास त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याला लक्षणे नसल्यास ‘होम आयसोलेशन’मध्ये किंवा ‘कोविड केअर सेंटर’मध्ये उपचार करण्यात यावे. लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींची दहा दिवस देखरेख आवश्यक आहे. लक्षणे असलेल्या व्यक्ती कोविड चाचणीसाठी समोर येत नाही व स्वत:च औषध घेतात किंवा खाजगी दवाखान्यात वा रुग्णालयात जाऊन उपचार करतात व ही माहिती मनपाला देत नाही.

परिणामस्वरुप अशा रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळत नाही. हे टाळण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला काही लक्षणे आढळल्यास त्यांनी शहरातील मनपाच्या `२१ कोविड टेस्टिंग सेंटर’पैकी संबंधित झोनमधील केंद्रात जाऊन चाचणी करावी. सदर रुग्ण उपचारासाठी जर एखाद्या खाजगी रुग्णालयात गेल्यास कायद्यान्वये त्या रुग्णालयाने त्याची माहिती मनपाला देणे आवश्यक आहे. शहरातील कोव्हिडच्या संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी या सर्व दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करून योग्य कार्यवाही करणे हे प्रत्येक झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने कार्य करावे, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com