भाजपचे विकास महामंडळांबाबतचे प्रेम हे पुतना मावशीचे : राष्ट्रवादीच्या तुकाराम बिडकर यांची टीका 

सत्तेवर असताना ज्या वैधानिक विकास महामंडळांबाबत निर्णय घेताना कोणतेही गांभीर्य राखले नाही, त्याच मंडळांना सत्ता गेल्यानंतर मुदतवाढ देण्याची मागणी करणारे भाजपचे हे प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे.
Tukaram Bidkar criticizes BJP over extension of development Board
Tukaram Bidkar criticizes BJP over extension of development Board

अकोला : सत्तेवर असताना ज्या वैधानिक विकास महामंडळांबाबत निर्णय घेताना कोणतेही गांभीर्य राखले नाही, त्याच मंडळांना सत्ता गेल्यानंतर मुदतवाढ देण्याची मागणी करणारे भाजपचे हे प्रेम म्हणजे पुतना मावशीचे प्रेम असल्याचा आरोप विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तुकाराम बिडकर यांनी केला आहे. 

महाराष्ट्रातील विकास मंडळांना मुदतवाढ न मिळाल्यामुळे भाजपने विकास मंडळांना मुदतवाढ तातडीने देण्याची मागणी केली आहे. सन 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपच्या सरकारने चार वर्षापर्यंत विकास मंडळांवर अध्यक्ष म्हणून कोणाचीही नेमणूक केली नव्हती. त्या काळात विभागीय आयुक्तांना अध्यक्षाच्या पदभार सांभाळायला दिला होता.

जून 2018 मध्ये तत्कालीन आमदार चैनसूख संचेती यांची विदर्भ विकास मंडळावर अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. परंतू त्यांना मंत्रिपद पाहिजे होते. मंडळ नको म्हणत त्यांनी एक वर्षभर त्या पदाचा स्वीकार केला नाही. एक प्रकारे राज्यपालांच्या आदेशाची अवहेलना केली. मंडळावर नेमायचे इतर सदस्यांची (दोन आमदार, दोन स्थानिक संस्थांचे पदाधिकारी) नियुक्तीच झाली नाही. यावरून विकास मंडळांबाबत भाजप किती गांभीर्याने पाहतो हे लक्षात येते, असे बिडकर म्हणाले. 

अध्यक्षांकडून राज्यपालांचा अवमान 

वास्तविक, आदेशाचा अवमान केल्याबद्दल संचेती यांना राज्यपालांनी पदावरून दूर करत दुसरा अध्यक्ष नेमायला हवा होता; पण दुर्दैवाने तसे झाले नाही. राज्यपाल त्यांची येण्याची वाट का पाहत बसले, हे एक कोडेच आहे. नंतर जून 2019 मध्ये त्यांनी नाइलाजाने अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. आता मात्र ज्यांनी अध्यक्ष म्हणून नेमल्यावर मंडळाकडे पाठ फिरवली, मंडळाकडे ढुंकूनही पाहिलं नाही, ते संचेती आज पुन्हा मंडळाला मुदतवाढीची मागणी करीत आहेत, याला काय म्हणावे, असा प्रश्न बिडकर यांनी उपस्थित केला. 

अनुशेष दूर करण्यात भाजपला अपयश

 विदर्भाची अर्थव्यवस्था ही कृषीशी निगडित आहे. सन 1994 च्या निर्देशांक व अनुशेष समितीच्या अहवालानुसार, विदर्भाचा त्यातही प्रामुख्याने पश्‍चिम विदर्भाचा सिंचनाचा अनुशेष अजूनही एक लाख साठ हजार हेक्‍टरचा आहे. तो दूर करण्यासाठी मागील पाच वर्षांत भाजपच्या सरकारला सपशेल अपयश आले. मागील पाच वर्षांत राज्यपालांच्या निर्देशानुसार सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दिलेल्या उद्दिष्टापैकी फक्त 25 टक्के उद्दिष्ट सरकार साध्य करू शकले. 

अनेक क्षेत्रातील अनुशेष वाढविण्यासाठी भाजप सरकार कारणीभूत ठरले. म्हणून आता विकास मंडळांना ताबडतोब मुदतवाढ द्यावी, ही मागणी करणे त्यांना शोभत नाही. कारण, स्वतः सत्तेवर असताना विकास मंडळाकडे त्यांनी कधीच गांभीर्याने पाहिले नाही. राज्यपालांच्या निर्देशाची त्यांनी अंमलबजावणी न करता पायमल्ली केली. आता मात्र त्यांना विकास मंडळाचे महत्त्व दिसत आहे. 

महाराष्ट्राचा समतोल विकास साधण्यासाठी व विदर्भ, मराठवाडा या अप्रगत विभागांसाठी समन्यायी निधीचे वाटप होण्यासाठी विकास मंडळाची आवश्‍यकता निश्‍चितपणे आहे. परंतु भाजपकडून केली जाणारी मुदतवाढीची मागणी मात्र राजकीय हेतूने केली असल्याचे दिसून येते, असे तुकाराम बिडकर म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com