shivajirao nilangekar had obtained his phd from nagpur university | Sarkarnama

शिवाजीराव निलंगेकरांनी नागपूर विद्यापीठातून मिळवली होती पीएचडी

मंगेश गोमासे
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

राजकीय प्रभावातून त्यांना पीएचडी देण्यात आली, अशी टीका त्यावेळी करण्यात आली होती. उच्चविद्याविभूषीत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांची ख्याती होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले.

नागपूर : उच्चविद्याविभूषीत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांची ख्याती होती. पीएचडी मिळविणारे ते पहिले मुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातून पीएचडी मिळविली होती. याशिवाय विधी शाखेची पदवी आणि मास्टर आॅफ आर्टची पदवीसुद्धा त्यांनी विशेष प्राविण्यासह नागपुरातूनच घेतली.

राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांचे काल निधन झाले. मराठवाडाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे शिवाजीराव निलंगेकर पाटील हे पीएचडी मिळविणारे पहिले मुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे त्यांनी ही पदवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातून मिळविली होती.

शिवाजीराव निलंगेकर पाटील यांनी दोन विषयांत पदव्युत्तर पदवी मिळवली होती. त्याकाळी एम.ए. आणि एल.एल.बी. या दोन्ही अभ्यासक्रमांना एकाच वेळेस बसता येणे केवळ नागपूर विद्यापीठातच शक्य होते. या दोन्ही पदव्या एकाच वेळेस संपादन करण्यासाठी हैदराबाद सोडून शिवाजीराव निलंगेकरांनी नागपुरात १९५२-५३ मध्ये आले. लॉच्या परीक्षेत तर विशेष प्रावीण्य प्राप्त करण्यातही निलंगेकरांनी यश मिळविले होते. विद्यार्थीदशेच्या या काळातच त्यांचे मित्र डॉ. प.ल. जोशी यांच्याशी मैत्र जुळले होते. या दोघांनीही धरमपेठ येथे सोबत वास्तव केले.

पुढे निलंगेकर एम.ए. एल.एल.बी. करून निलंग्याला गेले आणि वकिली करता करता राजकारणात प्रवेशित झाले. त्यांचे मित्र पी.एल. जोशी एम.म.चे शिक्षण घेऊन नागपूरात संशोधन कार्य करीत राहिले आणि नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख झाले. नंतरच्या काळात डॉ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगेकरांनी संशोधनकार्याला सुरुवात केली. त्यांनी ‘पॉलिटीकल अवेअरनेस, मोबिलायझेशन - अ चेंज इन मराठवाडा़' या विषयावर विभागप्रमुख प्रो.प.ल. जोशी यांच्या मार्गदर्शनात शोधप्रबंध सादर केला होता. शिवाजीराव निलंगेकर पाटील १९८५-८६ या वर्षात राज्याचे मुख्यमंत्री होते. याच काळात त्यांना विद्यापीठाने दीक्षान्त समारंभात पीएच.डी.ने सन्मानित केले होते.

शिवाजीराव निलंगेकर यांचे मराठवाड्याच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांच्या शोधप्रबंधातून त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा आलेख मांडला होता. याचाच ध्यास घेत त्यांनी १९६८ महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टची स्थापना केली. शालेय शिक्षण ते उच्च शिक्षणापर्यंत संस्था उभ्या केल्यात. शिवाय त्याला व्यावसायिकतेची जोड देत फार्मसी आणि अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू केली. यातून मराठवाड्यात शिक्षणाची गंगा वाहू लागली.

पीएच.डी.वरुन राजकीय वाद
राजकीय पार्श्वभूमी असलेले शिवाजीराव निलंगेकर पाटील यांचे प्रो. प.ल. जोशी हे अतिशय चांगले मित्र होते. मात्र, शिवाजीराव निलंगेकर पाटील यांनी रीतसर नोंदणी करून आणि नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. मधुसूदन चान्सरकर यांच्याकडून सर्व मान्यता घेतल्या होत्या. मात्र, राजकीय प्रभावातून त्यांना पीएचडी देण्यात आली, अशी टीका त्यावेळी करण्यात आली होती. उच्चविद्याविभूषीत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांची ख्याती होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले.   (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख