तुपकरांनी घेतली नितीन गडकरींची भेट - Ravikant Tupkar Held Discussion with Nitin Gadkaray | Politics Marathi News - Sarkarnama

तुपकरांनी घेतली नितीन गडकरींची भेट

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्व पक्षीय शेतकरी नेत्यांची बैठक घ्यावी, अशी आग्रह मागणी 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी केली. रविवारी त्यांनी नागपूर येथे गडकरींची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दीड तास चर्चा केली.

नागपूर :  विदर्भ- मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन, तूर तसेच धान उत्पादक शेतकरी अतिवृष्टी व परतीच्या पावसाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाला आहे दुसरीकडे केंद्र सरकारच्या शेती धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्व पक्षीय शेतकरी नेत्यांची बैठक घ्यावी, अशी आग्रह मागणी 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी केली. रविवारी त्यांनी नागपूर येथे गडकरींची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दीड तास चर्चा केली.

अतिवृष्टीमुळे विदर्भ- मराठवाड्यातील सोयाबी नउद्ध्वस्त झाले आहे, बोंडअळीमुळे कापूस वाया गेला असून तूर आयात केल्यामुळे भाव पडले आहेत. त्यातच केंद्र सरकारने पाम तेलावरील आयात शुल्क १० टक्के कमी केल्याने सोयाबीन उत्पादक अडचणीत आला आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर उत्पादकांना दिलासा देण्यासाठी धोरण बदलणे गरजेचे आहे, असे स्प्ष्ट करताना तुपकरांनी गडकरी यांच्याकडे विविध मागण्या केल्या.

केंद्र सरकारने पाम तेलावरील आयात शुल्क ४० टक्के करावे, सोयाबीनच्या ढेपेला निर्यात अनुदान द्यावे, सोयाबीनच्या तेलावर किमान ४५ % आयात शुल्क लावावे, सोयाबीन प्रक्रिया उद्योगांना केंद्र सरकारने अनुदान द्यावे, हमीभावाने कापूस खरेदीसाठी सीसीआयची खरेदी केंद्रे तालुकानिहाय सुरू करावी, कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी. रुईचा खंडीचा भाव किमान ५० हजार रुपये स्थिर करावा, रुईच्या निर्यातीसंदर्भात बांगलादेशसोबत होऊ घातलेला करार लवकर पूर्ण करावा, व्हिएतनाम व बांगलादेशसाठी रुईच्या निर्यातीला अनुदान द्यावे, १२ टक्क्यांपर्यंत ओलावा असलेला कापूसच खरेदी होईल अशी घातलेली अट रद्द करून ओलाव्याची अट १५ टक्क्यांपर्यंत करावी, सिंगल फेज जिनिंग, रुईची ढेप इ. लघू उद्योगांना प्रोत्साहन द्यावे, तूर डाळ आयातीचा निर्णय रद्द करावा, तुरीचे दर किमान ९००० रु. स्थिर राहतील एवढीच तूर डाळ आयात, बियाणे कायद्यातही दुरुस्ती करावी करावी इत्यादी आणि अन्य मागण्यांचे निवेदन त्यांनी गडकरी यांना दिले. यावेळी 'स्वाभिमानी'चे विदर्भ अध्यक्ष दामूअण्णा इंगोले, भाजपाचे नेते दिनेश सूर्यवंशी, 'स्वाभिमानी'चे नागपूर जिल्हाध्यक्ष दयाल राऊत उपस्थित होते.

हमीभावाबाबत कठोर कायद्याची गरज
केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक अत्यंत संदिग्ध स्वरूपाचे व शेतकऱ्यांसाठी हितावह नाही. यात हमीभावाबाबत तसेच हमीभावाच्या उल्लंघनाबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद नाही. तसेच कृषी विधेयकांच्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनेवर कडक कारवाईची तरतूद नाही. त्यामुळे या विधेयकात हमीभावाचे संरक्षण, हमीभाव ठरविण्याची पद्धत व हमीभावाचे उल्लंघन केल्यास होणारी फौजदारी कारवाई याची स्पष्ट तरतूद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी तुपकर यांनी केली.

शेतीच्या विविध प्रश्नांवर शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अपेक्षा काय आहेत यासंदर्भात नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली. अतिवृष्टीमुळे राज्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई तोकडी असून केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदतीच्या पॅकेजची घोषणा करावी याबाबत भेटीत चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून केंद्रातील संबंधित मंत्र्यांशी लवकर चर्चा करण्यात येईल असे आश्वासन गडकरींनी दिले आहे. -रविकांत तुपकर 'स्वाभिमानी'चे नेते

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख