राणे कुटुंब आत्महत्या प्रकरण : धीरजची आई आली समोर, तपासाची दिशा बदलली - rane family suicide case dheerajs mother came forward the direction of investigation changed | Politics Marathi News - Sarkarnama

राणे कुटुंब आत्महत्या प्रकरण : धीरजची आई आली समोर, तपासाची दिशा बदलली

अनिल कांबळे
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

प्रा. धीरज राणे यांच्या मोबाईल कॉल डाटा काढला असता तीन महिलांशी वारंवार संपर्क झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्या तीनही महिलांना काल पोलिसांनी चौकशीसाठी   बोलावले होते. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. धीरज तणावात होता, असे त्या महिलांनी पोलिसांना सांगितले.

नागपूर : प्राध्यापक धीरज राणे यांना लहानपणी सोडून गेलेली त्याची आई अचानक समोर आल्याने राणे कुटुंबीयांच्या आत्महत्याप्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. आई घरात आल्यापासून पती, पत्नीमध्ये भांडणाला सुरुवात झाली होती. हे सुद्धा आत्महत्येचे कारण असू शकते का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे समजते. 

पतीच्या मृत्यूनंतर धीरजच्या आईने दुसरे लग्न केले होते. तेव्हापासून धीरज आत्याकडेच मोठा झाला. आईचा दुसरा पतीही अकाली मरण पावला. त्यामुळे आई पुन्हा धीरजच्या संपर्कात आली होती. धीरजला आईची माया लागली होती. त्यांच्या भेटीपण व्हायला लागल्या होत्या. याच कारणावरून पती-पत्नीत भांडण होत होते. पती आम्हांला सोडून आईकडे जाऊ शकतो किंवा आई घरात राहायला येऊ शकते. सुखी संसार येणाऱ्या सासूमुळे बिघडेल, अशी भीती डॉ. सुषमा हिला होती. त्यामुळेच डॉ. सुषमा हिने तिघांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. सुषमा राणे हिने पती प्रा. धीरज राणे, मुलगा ध्रुव आणि मुलगी लावण्या यांना जेवणातून झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यानंतर तिघांनाही ॲनेस्थेसियाचे हायडोज इंजेक्शन्स दिलेत. तिघांचाही मृत्यू झाल्यानंतर डॉ. सुषमाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. १८ ऑगस्टला घडलेल्या राणे कुटुंब आत्महत्या प्रकरणाचा गुंता वाढता वाढत चालला आहे. डॉ. सुषमाने पती व मुलांचा जीव का घेतला? याचा उलगडा पोलिसांना अद्याप करता आला नाही. धीरजच्या बालपणीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याच्या आईने मुलाला आत्याकडे सोडून दुसरे लग्न केले होते. दुसऱ्या पतीचाही गेल्या काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. आईने मुलगा धीरज याचा शोध घेतला. त्याची भेट घेतली. दोघे मायलेक गहिवरले. याची माहिती डॉ. सुषमाला मिळाली होती. याच कारणावरून पती-पत्नीत भांडण व्हायला लागले होते. 

तीन महिलांची चौकशी 
प्रा. धीरज राणे यांच्या मोबाईल कॉल डाटा काढला असता तीन महिलांशी वारंवार संपर्क झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्या तीनही महिलांना काल पोलिसांनी चौकशीसाठी   बोलावले होते. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. धीरज तणावात होता, असे त्या महिलांनी पोलिसांना सांगितले.     (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख