बंदूक सोडून हाती पुस्तक घेतलेल्या रजूला व्हायचंय पोलिस! - Raju Hidami, who surrendered after leaving the Naxalite movement, passed 10th | Politics Marathi News - Sarkarnama

बंदूक सोडून हाती पुस्तक घेतलेल्या रजूला व्हायचंय पोलिस!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 जुलै 2021

नलक्षींबरोबर असताना तिने पोलिसांवरही गोळीबार केला होता. 

देवरी (जि. गोंदिया) : गोंदिया पोलिसांसमोर तिने २०१८ मध्ये नक्षली चळवळीतील बंदूक सोडून आत्मसर्मपण केले. नक्षल सेलमधील कर्मचाऱ्यांनी तिला शिक्षण देण्याचा निर्णय घेत तिच्या हाती पुस्तके दिली. पण, शाळेत तिला मराठी आणि गणित विषय समजून घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. पण पोलिस कर्मचाऱ्यांनीही हार मानली नाही. तिचे जादा तास घेत तिला शिकविले. यंदा ती ५१. ८० टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाली आहे. तिला भविष्यात शिकून महाराष्ट्र पोलिस दलात जायचे आहे. (Raju Hidami, who surrendered after leaving the Naxalite movement, passed 10th)

ही गोष्ट आहे, सुमारे तीन वर्षांपूर्वी नक्षली चळवळ सोडलेल्या १६ वर्षीय रजूला हिडामी हिची. नक्षली चळवळ सोडली, त्यावेळी तिच्यावर अर्धा डझनहून अधिक गुन्हे होते. नलक्षींबरोबर असताना तिने पोलिसांवरही गोळीबार केला होता. 

हेही वाचा : राऊतांविरोधातील त्या महिलेच्या याचिकेवरील निकाल कोर्टाने राखून ठेवला

रजूला ही मूळची गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील लाव्हारी गावची रहिवासी आहे. तिने गडचिरोलीच्या कोरची-खोब्रेमेंदा-कुरखेडा (केकेडी) दलममध्ये काम केले. रजूला हिडामीने २०१८ मध्ये गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. पोलिसांनी तिला पुन्हा शिक्षणासाठी मदत केल्याने हा बदल घडल्याचे सांगण्यात येते. 

तत्कालीन पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मदतीने नक्षल सेलच्या पोलिसांनी रजूला हिडामी हिला देवरी येथील आदिवासी मुलींच्या शाळा व वसतिगृहात दाखल केले. तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांनी तिच्यासाठी शाळेचे एक किट, बॅग, पुस्तके, सायकल आणि गणवेशदेखील खरेदी करून दिले होते.

रजुलाच्या डोक्यावरील वडिलाचे छत्र लहानपणीच हरपले. तीन बहीण-भावांपैकी सर्वांत लहान असलेल्या रजूला हिने एके दिवशी जंगलात चरण्यासाठी जनावरांना नेले होते. तिथे नक्षलवाद्यांनी तिचा सेलफोन हिसकावून घेतला. दिशानिर्देश विचारण्याच्या बहाण्याने तिला बरोबर घेऊन गेले ते थेट नक्षलींच्या अड्ड्यात दाखल करून घेतले. नक्षलवाद्यांनी तिला शस्त्रांव्यतिरिक्त वॉकी-टॉकी आणि इतर गॅझेट्स वापरण्याचे प्रशिक्षण दिले होते. देवरी येथील एका पोलिस कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, रजुलाचे शिक्षण पुन्हा सुरू करण्यात अनेक अडथळे आले. शाळेतील प्रवेश बंद होते. तिच्याकडे कागदपत्रेसुद्धा नव्हती. तिच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून दिली.

 
मराठी आणि गणिताशी झगडावे लागले

रजुला हिच्या आईने दुसरे लग्न केले आहे. ती इतरत्र स्थायिक झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मुलीची काळजी घेण्याचे ठरविले. २०१९ ते २०२१ मध्ये गोंदियात आठवी ते दहावीच्या परीक्षेत तिला मराठी भाषा आणि गणिताशी झगडावे लागले. म्हणून येथील नक्षल सेलमधील कर्मचाऱ्यांनी शिक्षक बनून तिला मदत केली. यामुळे तिच्या अभ्यासात दुप्पट वाढ झाली आणि ती दहावी उत्तीर्ण झाली. पोलिस दलात दाखल होण्याची तिची इच्छा आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख