तुम्ही निष्क्रिय आमदार आहात, असे म्हणताच राजकुमार पटेल भडकले ..... - Rajkumar Patel got angry when he said that you are an inactive MLA | Politics Marathi News - Sarkarnama

तुम्ही निष्क्रिय आमदार आहात, असे म्हणताच राजकुमार पटेल भडकले .....

अरुण जोशी
शनिवार, 3 जुलै 2021

‘ए बाबा, जास्त बोलू नको’.

अमरावती : आदिवासी बांधवांच्या समस्या घेऊन नंदुरबारवरून धारणीमध्ये आलेले आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. त्याचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुमच्या मतदारसंघातील आदिवासी तरुणांना तरुणांना नोकऱ्या मिळत नाही. त्यांच्या शिक्षणाचा अपमान होत आहे, असे म्हणताच आमदार राजकुमार पटेल यांचा पारा चढला अन् चांगलीच बाचाबाची झाली. (Rajkumar Patel got angry when he said that you are an inactive MLA)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही आदिवासी बांधव हे आदिवासी बांधवांच्या मागण्या घेऊन त्यांचे निवेदन देण्यासाठी आमदार राजकुमार पटेल यांना भेटण्यासाठी गेले होते. तुम्ही निष्क्रिय आमदार आहात, तुमच्या मतदारसंघातील आदिवासी तरुणांना नोकऱ्या मिळत नाही. त्यांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणसुद्धा घेतलेले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा अपमान होत आहे, असे म्हणताच आमदार आमदार पटेल भडकले. आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व राजकुमार पटेल यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर तेथे काही वेळ तणावसदृश्य वातावरण होते. 

हेही वाचा : पडळकरांच्या गाडीवर हल्ला : शेतकऱ्यांच्या वेशातून जाऊन पोलिसांनी दोघांना पकडले

त्यानंतर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विश्रामगृहात जाऊन आमदारांविरोधात एक व्हिडिओ तयार करून व्हायरल केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर आमदार राजकुमार पटेल आणि आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी केल्याची माहिती आहे. संघटनेचे पदाधिकारी सांगत होते की नोकऱ्यांमध्ये भरती करताना बोगस आदिवासींची भरती करण्यात आली. खऱ्या आदिवासींना डावलण्यात आले. तत्कालीन फडणवीस सरकारने पाटील समिती स्थापन केली आणि महाविकास आघाडी सरकारने भुजबळ समिती स्थापन केली. पण या समित्यांनी काहीही केले नाही. 

सर्वोच्च न्यायालयापेक्षा सरकार मोठे झाले का, असा प्रश्‍न करीत सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून समित्या स्थापन केल्या आहेत. भुजबळ समितीला वारंवार मुदतवाढ दिली गेली. याचा अर्थ सरकारला बोगस आदिवासींना वाचवायचे आहे आणि खऱ्या आदिवासींवर अन्याय आहे. आदिवासी तरुणाने मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. येवढे शिक्षण घेऊनही वेठबिगारीवर तरुण कामाला जात आहे. हा त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा अपमान आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी असे म्हणताच, ‘ए बाबा, जास्त बोलू नको’, असे म्हणत आमदार पटेल त्यांच्यावर चिडले. अन् मग नंतर चांगलीच बाचाबाची झाली. 

आमदार पटेल यांनी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे होते, चिडण्याचे काहीएक कारण नव्हते, अशा प्रतिक्रिया नंतर उमटल्या. आता पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी झाल्याने या प्रकरण पुढे काय वळण घेते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख