प्रिती दास, मंगेश कडव, साहिल सैय्यद आणि आता तपन, काय चाललंय उपराजधानीत? 

तपन जयस्वालच्या घरातून गुन्हे शाखेला पोतभर दस्तावेज मिळाले आहेत. यामध्ये व्याजाने दिलेल्या पैशाचे हिशेब, प्रॉपर्टीची कागदपत्रे, सही असलेले कोरे धनादेश, गहाणपत्रे तसेच अनेकांचे अंगठ्याचे ठसे असलेले स्टॅंप पेपरसुद्धा मिळाल्याचे सांगण्यात येते. तपनने अवैध सावकारीत जवळपास 100 ते 200 कोटी रुपये व्याजाने वाटल्याची शक्‍यता आहे.
Crime
Crime

नागपूर : लुटेरी दुल्हन नावाने कुख्यात असलेली प्रिती दास हीला खंडणी वसुलीच्या गुन्ह्यांत मार्च महिन्यात अटक करण्यात आली. प्रिती प्रकरण शांत होत नाही तोच एप्रिल महिन्यात शिवसेनेचा संजोत राठोड आणि युवा सेनेचा विक्रम राठोड यांना आणि त्यापाठोपाठ शिवसेनेचा शहरप्रमुख मंगेश कडवला खंडणीच्याच गुन्यांत अटक झाली. कडवच्या कारनाम्यांची चर्चा थांबते न थांबते तोच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कथित माजी पदाधिकारी साहिल सैय्यदलाही त्याच गुन्ह्यांत अटक झाली. हे प्रकरण राजकीय वर्तुळात चांगलेच गाजले. आताशा राजकीय पक्षांतील खंडणीबाजांची चर्चा थांबेल असे वाटत असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी तपन जयस्वाल याला गुन्हे शाखेने आज अटक केली. 

एमआयडीसीतील झिरो डिग्री बारचा मालक तपन जयस्वालने आपल्या चार साथिदारांच्या मदतीने एका युवकाला खंडणीची मागणी केली. तसेच त्याच्याकडून पावने दोन लाख रुपये उकळून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी तपन जयस्वालसह चौघांविरूद्ध खंडणीचे गुन्हे नोंदविले आहे. या प्रकरणी जयस्वालसह चौघांना गुन्हे शाखेने सोमवारी रात्रीच अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपन जयस्वाल हा भारतीय जनता युवा मोर्चाचा मोठा पदाधिकारी आहे. जयस्वालचे एमआयडीसी परिसरात "झिरो डिग्री' आणि "एस' नावाने दोन बार आहेत. वादग्रस्त असलेल्या तपनच्या बारमध्ये अर्धनग्न होऊन बारबाला नाचतात आणि त्यांच्यावर शहरातील नामवंत व्यापारी, राजकीय नेते आणि गुंड प्रवृत्तीचे लोक लाखोंनी पैसा उधळतात, अशी चर्चा आहे. तपनने स्वतःच्या सुरक्षेसाठी गुंडांच्या दोन ते तीन टोळ्या ठेवल्या असून त्या टोळ्यांचा तपन "फायनान्सर' असल्याची चर्चा आहे. 

गोपालनगरमधील समीर दिलीपराव इंगळे याला आर्थिक अडचण असल्यामुळे पैशांची नितांत गरज होती. तपन जयस्वालने सावकारीचा अवैध व्यवसाय सुरू केला होता. तपनने समीरला 19 एप्रिल 219 ला 70 हजार रूपये दर आठवड्याला 15 टक्‍के व्याजाने दिले होते. तेव्हापासून तो दर आठवड्याला व्याज घेत होता. व्याज थकल्यानंतर जयस्वालने खामल्यातील कुख्यात गुंड विक्‍की गजभीये, बंटी बोरकर आणि समीर उर्फ बाळा राऊत यांच्या सोबत जाऊन समीरची भेट घेतली. त्याला पैशाची मागणी केली. तसेच त्याच्याकडून कोऱ्या चेकवर बळजबरीने सही करून घेतली. त्यानंतर चेकची भीती दाखवून आतापर्यंत समीरकडून तपन आणि त्याच्या गुंडांनी लाखो रूपये उकळले. या प्रकरणी समीरच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी तपन जयस्वाल आणि त्याच्या टोळीवर गुन्हे दाखल केले आहेत. 

कळमेश्‍वर फायरिंगचा मास्टरमाईंड? 
तपन जयस्वाल याने तयार केलेल्या एका टोळीचा म्होरक्‍या गोलू मलिये आहे. तो गोलूकडून गुन्हेगारी कारवाया करून घेत होता. त्यामुळे कळमेश्‍वरमधील गणेश मेश्राम व त्याची पत्नी प्रियंकावर झालेल्या गोळीबार कांडाचाही तपन मास्टरमाईंड असू शकतो. याच संशयावरून तपनला गुन्हे शाखेने अटक केल्याची चर्चा आहे. 

तपनचा होणार "मंगेश-साहिल' 
तपन जयस्वाल याचे एक-एक काळे धंदे बाहेर निघत असून सध्या बजाजनगरात खंडणीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. तपन जयस्वाल प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रीती दास, मंगेश कडव, संजोत राठोड, विक्रम राठोड आणि साहिल सैयदसारखीच स्थिती तपनची होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

तपनच्या घरातून पोतेभर दस्तावेज जप्त 
तपन जयस्वालच्या घरातून गुन्हे शाखेला पोतभर दस्तावेज मिळाले आहेत. यामध्ये व्याजाने दिलेल्या पैशाचे हिशेब, प्रॉपर्टीची कागदपत्रे, सही असलेले कोरे धनादेश, गहाणपत्रे तसेच अनेकांचे अंगठ्याचे ठसे असलेले स्टॅंप पेपरसुद्धा मिळाल्याचे सांगण्यात येते. तपनने अवैध सावकारीत जवळपास 100 ते 200 कोटी रुपये व्याजाने वाटल्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com