‘पदवीधर’ची धुरा सांभाळणारे नगरसेवक फक्त सहा नगरसेवक पदवीधर! - Only Six Coroprators of Kamthi eligible for Graduate election voting | Politics Marathi News - Sarkarnama

‘पदवीधर’ची धुरा सांभाळणारे नगरसेवक फक्त सहा नगरसेवक पदवीधर!

सतीश दहाट
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

बोचऱ्या थंडीत नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापले आहे. यानिमित्ताने महविकास आघाडी आणि भाजप पुन्हा समोरासमोर आले आहे. परंतु, उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारेच कामठी नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह बहुतांश नगरसेवक अपदवीधर आहेत

कामठी (जि. नागपूर) : बोचऱ्या थंडीत नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापले आहे. यानिमित्ताने महविकास आघाडी आणि भाजप पुन्हा समोरासमोर आले आहे. परंतु, उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारेच कामठी नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह बहुतांश नगरसेवक अपदवीधर आहेत. ३४ पैकी फक्त सहा नगरसेवक पदवीधर असल्याने शहरातील बहुतेक विद्यमान नगरसेवक मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत.

एक डिसेंबर रोजी नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक होणार असून, कोणत्याही शाखेतील पदवी (नोंदणी केलेला) मतदानासाठी पात्र असतो. तालुक्यात दोन हजारांच्यावर पदवीधर, पदवुत्तर मतदारांनी नोंदणी केली आहे. यंदा होणाऱ्या निवडणुकीत १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले भाग्य अजमावित आहेत. त्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू केल्याचे दिसून येते. हे प्रमुख कार्यकर्ते म्हणजे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, नगर परिषद व नगरपंचायत सदस्य, महानगर पालिका सदस्य यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

निवडणुकीची धुरा पक्षाकडून यांच्यावर सोपविली जात असते. प्रत्येक मतदारकडे उमेदवाराला पोहोचणे शक्य होत नसल्याने उमेदवार फक्त महत्वाच्या ठिकाणी म्हणजे शाळा, कॉलेज, महाविद्यालय येथे भेट देऊन प्रचार करतात. मात्र, पक्षाचे निर्वाचित सदस्य गावोगावी जाऊन मतदारांशी भेटी घालतात. सर्वात म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत सदस्य या उमेदवारांना आपल्या उमेदवारासाठी मत मिळविण्यासाठी मात्र धावपळ करतात.

परंतु, निर्वाचित सदस्यांत बोटावर मोजण्याइतकेच पदवीधर शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले असतात. तरी सुद्धा यांच्यात शिक्षित उमेदवारांना आकर्षित करण्याची ताकत असते, हे मात्र नक्कीच! निवडणुकीत किती प्रमाणात उच्च शिक्षित वर्ग सहभाग घेतात हे कामठी नगर परिषदचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी प्राप्त केलेल्या शैक्षणिक अहर्ताप्राप्त यादीवरून दिसून येत आहे.

निरज लोणारे बीए प्रथम वर्ष, तर चार पदवीधर तर दोन पदवीव्युत्तेर असून यात एक महिला नगरसेवक आहे. पदवीधरमध्ये दोन महिला असून दोन पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे. यापैकीच मग ते ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पंचायत सदस्य किंवा नगर परिषद सदस्य असो हेच उमेदवाराला मत मिळवून देण्यास महत्वाची भूमिका बजावणार आहेत. नगर परिषद सदस्याची शैक्षणिक अहर्ता नगर परिषदेची निवडणूक अर्जात उमेदवारांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे.

२,२७६ मतदार, चार केंद्रांवर होणार मतदान
तालुक्यात २,२७६ पदवीधर मतदार आहेत. यात १,२१७ पुरुष तर १,०५९ महिला पदवीधर मतदार आहेत. या मतदारकरिता मतदान करण्यासाठी चार मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. यात तहसील कार्यालय कामठी येथे एक, पंचायत समिती कार्यालय एक व कोराडी येथील विद्या मंदिर हायस्कूल दोन असे एकूण चार केंद्र राहणार आहेत. कोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत असलेल्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार एस. एम. कावटी यांनी दिली.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख