तुकाराम मुंढेंच्या विरोधात रस्त्यावर उतरले आमदार विकास ठाकरे - Nagpur MLA Vikas Thackeray Up in Arms against Commissioner Tukaram Mundhe | Politics Marathi News - Sarkarnama

तुकाराम मुंढेंच्या विरोधात रस्त्यावर उतरले आमदार विकास ठाकरे

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 11 मे 2020

नागपूरच्या एका इमारतीत रुग्णालय सुरू करण्याचा चंगच आयुक्तांनी बांधला. त्यामुळे स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. नागरिक रस्त्यावर येताच आमदार विकास ठाकरे हेही या आंदोलनात सहभागी झाले. लॉकडाउन असतानाही नागरिकांनी गर्दी करीत महापालिका प्रशासन, मनपा आयुक्तांविरोधात जोरदार नारेबाजी करीत आंदोलन केले.

नागपूर : कोरोनाबाधित रुग्णांसाठी सेमिनरी हिल परिसरातील महापालिकेच्या इमारतीत रुग्णालय सुरू करण्यास पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्यासह नागरिकांनी विरोध केला. लॉकडाउन असूनही नागरिकांनी एकत्र येत पोलिसांपुढेच आंदोलन केले. प्रस्तावित रुग्णालयाच्या बाजूनेच दाट लोकवस्ती असल्याने नागरिक काल महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले. 

पश्‍चिम नागपुरातील फ्रेण्डस कॉलनी येथील दाट लोकवस्तीच्या परिसरात महापालिकेच्या स्थावर विभागाची इमारत आहे. या इमारतीला लागूनच महापालिकेचे केटीनगर प्राथमिक आरोग्य केंद्रही आहे. महापालिकेने स्थावर विभागाच्या या इमारतीत रुग्णालय व विलगीकरण केंद्र प्रस्तावित केले आहे. येथील नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे अनेक निवेदन देत या रुग्णालयाला विरोध केला. महापालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने नागरिक पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्याकडे गेले. आमदार विकास ठाकरे यांनीही विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले. 

या इमारतीत रुग्णालय सुरू करण्याचा चंगच आयुक्तांनी बांधला. त्यामुळे स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. नागरिक रस्त्यावर येताच आमदार विकास ठाकरे हेही या आंदोलनात सहभागी झाले. लॉकडाउन असतानाही नागरिकांनी गर्दी करीत महापालिका प्रशासन, मनपा आयुक्तांविरोधात जोरदार नारेबाजी करीत आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस होते. या भागात कुठलेही रुग्णालय होऊ देणार नाही, अशी ग्वाही आमदार विकास ठाकरे यांनी स्थानिक नागरिकांना दिली. 

कोरोनाबाधितांसाठी प्रस्तावित रुग्णालयामुळे स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. आयुक्त तुकाराम मुंढे कुठल्याही लोकप्रतिनिधीला विश्‍वासात न घेता हुकूमशाही पद्धतीने काम करीत आहेत. कुठल्याही स्थितीत येथे रुग्णालय होऊ देणार नाही. आयुक्त मुंढे यांना मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावून घ्यावे. तेथे त्यांची जास्त गरज आहे. 
- विकास ठाकरे, आमदार, पश्‍चिम नागपूर.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख