नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना कोरोना  - Nagpur Mayor Sandip Joshi Corona Positive | Politics Marathi News - Sarkarnama

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना कोरोना 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

महापौर संदीप जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली. काल त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे

नागपूर : महापौर संदीप जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः ट्विटरवरून त्यांनी ही माहिती दिली. काल त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

यापूर्वी संदीप जोशी यांचा वाहनचालक आणि काही स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ते स्वतःहून क्वारंटाईन झाले होते. तेव्हा त्यांना कोरोना झाला नव्हता. त्यानंतरही कोरोनाच्या लढ्यात ते सक्रिय होते. शहरातील रस्त्यांवर उतरून त्यांनी कोरोनाबाबत जनजागृती केली होती. गेल्या ८ महिन्यांपासून कोरोनाशी लढत असून शेवटी मलाच कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, असे अंदाज यंत्रणेकडून वर्तविले जात होते. मात्र शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. पण शहराच्या प्रथम नागरिकालाच कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले. 

नुकतीच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. संदीप जोशी यांनी ही निवडणूक लढविली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात फिरले होते. त्यामुळे अनेक कार्यकर्ते तसेच मतदार त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे या सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

दरम्यान, नागपुरात बुधवारी कोरोनाचे नव्याने ४०३ रुग्ण सापडले असून ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण  ५८७३ जणांवर उपचार सुरू आहेत. यांपैकी ११०९ रुग्ण नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेडिकलसह जिल्ह्यातील रुग्णालयांत उपचार घेत आहेत, तर उर्वरित रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.
Edited By : Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख