आता घालून बघा पोलीसांसोबत हुज्जत, एसआरपीएफने घेतला अर्ध्या नागपुरचा ताबा  - Nagpur City News SRPF Took Charge of Half of the City To Handle Lock Down Situation | Politics Marathi News - Sarkarnama

आता घालून बघा पोलीसांसोबत हुज्जत, एसआरपीएफने घेतला अर्ध्या नागपुरचा ताबा 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 एप्रिल 2020

दोन महिन्यांपूर्वी शहरात कोरोना बाधित आढळले होते. तसेच मरकज दिल्लीतूनही काही नागरिक नागपुरात दडून बसले होते. शहरात संचारबंदी आणि लॉकडाऊन असतानाही शहर पोलिस कर्मचाऱ्यांना नागपूरकर सहकार्य करीत नव्हते. विनाकारण रस्त्यावर फिरणे किंवा कोणतेही कारण सांगून पोलिसांशी हुज्जत घालणे किंवा थेट हल्ला करण्यापर्यंत लोकांनी मजल मारली होती.

नागपूर : कोरोनाचे वाढते संकट आणि नागरिकांचा असहकार. नागरिकांकडून पोलिस कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले किंवा हुज्जतबाजी लक्षात घेता "रामबाण' उपाय म्हणून आता अर्ध्या शहरात राज्य राखीव पोलिस दलाचे जवान (एसआरपीएफ) तैनात करण्यात आले आहेत. तसेच इंडियन रिझर्व्ह बटालियनचे पथक (आयआरबीपी) देखील तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित परिसरांसह अन्य भागात जर कुणी पोलिसांशी हुज्जत घातल्यास काही खैर नाही, हे विशेष. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी शहरात कोरोना बाधित आढळले होते. तसेच मरकज दिल्लीतूनही काही नागरिक नागपुरात दडून बसले होते. शहरात संचारबंदी आणि लॉकडाऊन असतानाही शहर पोलिस कर्मचाऱ्यांना नागपूरकर सहकार्य करीत नव्हते. विनाकारण रस्त्यावर फिरणे किंवा कोणतेही कारण सांगून पोलिसांशी हुज्जत घालणे किंवा थेट हल्ला करण्यापर्यंत लोकांनी मजल मारली होती. ही बाब लक्षात घेता आणि शहरातील कोरोनाचा फैलाव पाहता आता पोलिस आयुक्‍त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात एसआरपीएफची सुरक्षा लावण्याचा निर्णय घेतला. शहरातील कोरोनाबाधित परिसरात एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मोमीनपुरा येथे काही रुग्ण पॉझीटिव्ह आढळून आल्याने हा परिसर सील करून तेथे राज्य राखीव पोलिस बलाची तुकडी तैनात करण्यात आली. 

राज्य राखीव पोलिस बलाच्या जवानांना मोमीनपुऱ्याच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने शहर पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलिस बलाचा आणि इंडियन रिझर्व्ह बटालियनची मदत घेण्यात आली. दोन्ही पथकांतील जवान काल सकाळी शहरात दाखल झाले. त्यात राज्य राखीव पोलिस बल गट 15 जवान परिमंडळ 3 येथे तैनात करण्यात आले. याच परिसरात मोठ्‌या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. त्यानुसार तहसील हद्दीत 6 सेक्‍शन, लकडगंज, शांतीनगर आणि गणेशपेठ हद्दीत प्रत्येकी 2 सेक्‍शन तैनात करण्यात आले. या ताफ्यात 4 अधिकारी आणि 90 जवानांचा समावेश आहे. 

राज्य राखीव पोलिस बल गट क्र. 13 चा ताफा परिमंडळ 4, 2 आणि 5 येथे तैनात करण्यात आला. परिमंडळ 4 मध्ये 1 सेक्‍शन (9 जवान), परिमंडळ 2 येथे 1 प्लॉटून (1 अधिकारी आणि 27 जवान) आणि परिमंडळ 5 येथे 1 प्लॉटून (1 अधिकारी आणि 27 जवान) असा ताफा तैनात करण्यात आला. याशिवाय 2 सेक्‍शन (1 अधिकारी आणि 18 कर्मचारी) शहर नियंत्रण कक्ष येथे राखीव म्हणून ठेवण्यात आला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख