मिहान उरले फक्त एअर कार्गो पुरते! नितीन गडकरींची कबुली

वैदर्भीयांना दाखवलेल्या आणखी एका स्वप्नावर पाणी फेरल्या गेले आहे.
Mihan rhyming only air cargo enough! Nitin Gadkari confession .jpg
Mihan rhyming only air cargo enough! Nitin Gadkari confession .jpg

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्वत: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला आणि हजारो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळवून देणार, म्हणून खूप गवगवा झालेला ‘मल्टिमोडल इंटरनॅशनल कार्गो हब अॅण्ड एअरपोर्ट अ‍ॅट नागपूर’ म्हणजेच ‘मिहान’ प्रकल्प आता केवळ हवाई मालवाहतुकीसाठी, म्हणजेच एअर कार्गोपुरताच उरल्याची कबुली खुद्द नितीन गडकरी यांनीच, रविवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे वैदर्भीयांना दाखवलेल्या आणखी एका स्वप्नावर पाणी फेरल्या गेले आहे.    

मिहान हा नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचा विमानतळ-प्रकल्प होता. नागपुरच्या भारतातील मध्यवर्ती स्थानाचा उपयोग करून, रस्ते व रेल्वे वाहतुकीचे जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करणे, हे मिहान प्रकल्पाचे उद्दिष्ट होते. 

या प्रकल्पात विमानासोबतच रेल्वे, ट्रक तसेच गाड्यांमधून होणाऱ्या मालवातुकीसाठी या प्रकल्पात लाॅजिस्टिक हब तयार करण्यात येणार होते. मात्र, आता लाॅजिस्टिक हब वर्धा जिल्ह्यातील शिंदी रेल्वे येथे होणार असून मिहानमधून फक्त एअर कार्गो सुरू राहिल, असे गडकरींनी स्पष्ट केले.

अजनी इंटर माॅडल स्टेशन

नागपूरमध्ये देशातील पहिले अजनी इंटर माॅडल स्टेशन उभारण्यात येत, असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. या प्रकल्पात जलमार्ग, रेल्वे, रस्ते व हवाई वाहतूक एकाच ठिकाणी राहणार असल्याचे गडकरींनी यांनी सांगितले. यासाठी रेल्वेची २०० एकर जमीन मिळणार आहे. या शिवाय काँकरची १०० एकर जमीन मागितली आहे. तसेच जलसंपदा व तुरूंग विभागाची मिळून एकूण ५०० ते ६०० एकर जमीन लागणार असून पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी म्हणाले.

दोन टप्प्यात प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यासाठी १२०० कोटी केंद्र सरकार देणार असून यात रेल्वे कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या प्रकल्पात कमीत कमी झाडे तोडल्या जातील, याकडे लक्ष दिले जाईल. काही झाडांचे पुनर्रोपण केले जाईल. हा प्रकल्प पर्यावरणपूरक राहील, याची ग्वाही गडकरींनी दिली.

 जाहीराती देत जाहो यांना...

अजनी मल्टी माॅडल स्टेशनच्या उभारणीत या परिसरातील वृक्षांची कत्तल होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांचा विरोध होत आहे. वर्तमानपत्रांतूनही लिहीले जात आहे. मात्र, हा विरोध गडकरींना सहन होताना दिसत नाही. म्हणून त्यांनी जाहीररित्या या प्रकल्पाच्या विरोधात लिहू नका अशी विनंती करताना वाटल्यास जाहीराती घ्या, असे सांगितले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर एनएचआयच्या एका बड्या अधिकाऱ्याला तिथेच ‘इनको जाहीरात देते जाओ जरा’, असे निर्देश दिले. त्यांच्या या निर्देशांची माध्यमकर्मींमध्ये खूप चर्चा झाली.

मी महाल सोडणार नाही

नितीन गडकरींना महाल सोडून पश्चिम नागपुरात यावे लागले. त्याची खंत ते नेहमी बोलून दाखवतात. १ लाख ६० हजार कोटीचा हायवे येत्या वर्षभरात तयार होईल. पण, महालातील केळीबाग रस्ता तयार झालेला नाही, असे गडकरींनी महापौर दयाशंकर तिवारींच्या तोंडावरच सांगितले. मी महाल सोडणार नाही. लवकरच तिथे राहायला जाईन, असे ते म्हणाले.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com