the liquor sellers courage or cure said to mla i will kill you | Sarkarnama

दारू विक्रेत्याची हिंमत की नाईलाज, आमदाराला म्हणाला ठार मारीन !

प्रमोद काकडे 
मंगळवार, 21 जुलै 2020

तुटक्या फुटक्या मराठीतून हे पत्र हाताने लिहिले आहे. पोस्टाद्वारे ते जोरगेवारांच्या कार्यालयात पोचले. निनावी पत्रासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना जोरगेवारांनी सूचना दिली आहे. 

चंद्रपूर : स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे वारंवार अवैध दारू विक्रीला आळा घालण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी दारूस्तकरांच्या मुसक्या आवळणे सुरू केले. त्यामुळे संतप्त झालेल्या एका दारूविक्रेत्याने निनावी पत्र पाठवून आमदार किशोर जोरगेवार यांना जिवानिशी मारण्याची धमकी दिली. सोबतच बेरोजगार लोकांच्या पोटावर लाथ मारू नका, अशी विनंतीही केली. त्यामुळे पत्र पाठवणारा दारू विक्रेता मस्तवाल, बेडर झाला की हा रोजगार बुडायला नको आणि शेवटचा उपाय म्हणून नाईलाजाने त्याने असे केले, हा प्रश्‍न चर्चिला जात आहे. 

मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात दारूबंदी आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ''दारू''चा विषय पुन्हा ऐरणीवर आला. पालकमंत्री विजय वडेट्टीवार दारू सुरू करणार, असे  सांगत आहेत. त्यामुळे परवानाधारक दारूविक्रेते दारू सुरू होण्याची वाट बघत आहेत. मात्र अवैधरीत्या दारू विकणा-यांची चिंता वाढली आहे. अवैधरीत्या दारू विक्री हा मोठा रोजगार या जिल्ह्यात आता तयार झाला आहे. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिलाही दारूविक्रीत उतरल्या आहेत. यातून अनेकांनी बक्कळ माया कमविली. काहींचे संसार सावरले. मात्र जिल्ह्यात संघटित दारू तस्करीची चर्चा सुरू झाली. याला राजकीय आशीर्वाद असल्याचे समोर आले. पोलिसांनाही मॅनेज केले गेले. त्यानंतर आपल्या मतदार संघात संघटित दारू विक्री नको, यासाठी आमदार किशोर जोरगेवार जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना अनेकदा भेटले. दारूविक्रीला आळा घाला, अशी मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी दारूविक्रेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली. यात अपवाद वगळता मोठे मासे हाती लागले. किरकोळ दारूविक्रेत्यांनाच या कारवाईची छळ पोचली. त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत. 

एका दारू विक्रेत्याने निनावी पत्राद्वारे आपली कैफियत आमदार जोरगेवार यांच्याकडे मांडली. सोबतच जीवे मारण्याची धमकीही दिली. पत्राच्या सुरवातीलाच तुम्ही आमदार म्हणून चांगले काम करीत असल्याची शाबासकी पत्र लिहीणाऱ्याने दिली. मात्र आमच्या सारख्या बेरोजगार लोकांच्या पोटावर लाथ मारणे बरोबर नाही. आपण अवैध दारूसंदर्भात जी भूमिका घेतली. ती चुकीची आहे. ते आपल्या जिवावरही बेतू शकते, अशी चेतावानी सुद्धा पत्रातून देण्यात आली. पुढे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या भेटीचाही उल्लेख केला. आपण वारंवार एसपी साहेबांना भेटता. त्यामुळे दारूविक्रेते त्रस्त झाले आहेत. यात आम्हा गरिबांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आमच्या सारख्या बेरोजगारांच्या पोटावर लाथ मारू नका. अन्यथा आपण किंवा आल्या परिवारातील सदस्याची जीवित हानी झाल्यास तुम्हीच जबाबदार असाल, अशी धमकीच पत्रातून दिली. तुटक्या फुटक्या मराठीतून हे पत्र हाताने लिहिले आहे. पोस्टाद्वारे ते जोरगेवारांच्या कार्यालयात पोचले. निनावी पत्रासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना जोरगेवारांनी सूचना दिली आहे. 

जनता माझ्या पाठीशी : आमदार जोरगेवार 
अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. संघटितरीत्या दारू विक्री सुरू आहे. विषारी दारू येत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही गंभीर बाब आहे. याविरोधात माझा लढा सुरू राहील. जनता माझ्या पाठीशी आहे.    (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख