inspired by a single sentence said mla girish vyas | Sarkarnama

एकाच वाक्याने झालो होतो प्रेरित : आमदार गिरीष व्यास

अतुल मेहेरे
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

आज २८ वर्ष झाले त्या गोष्टीला. आजही त्या दिवसाच्या आठवणी आमच्या मनात ताज्या आहेत. राम मंदिर होतेय, आज मंदिराचे भूमिपूजन होतेय. याचा अत्याधिक आनंद आम्ही आणि आमच्यासारख्या असंख्य राम भक्तांना होतोय. आज राममंदिराचे भमिपूजन होतेय. या देशातीलच नव्हे, तर जगाच्या पाठीवर जिथे कुठे हिंदू आहे, त्या प्रत्येकासाठी आज आनंदाचा दिवस आहे, असे परेश जोशी म्हणाले. 

नागपूर : ‘सौगंध राम की खाते हैं, मंदिर वही बनायेंगे’, या एकाच वाक्याने आम्ही सर्व प्रेरित झालो होतो. या देशातला प्रत्येक हिंदू प्रेरित होऊन त्या दिशेने जायला लागला होता. आम्ही खोट्या लग्नाची पत्रिका तिथला पत्ता घेऊन छापली होती. फैजाबादचा पत्ता त्यावर देऊन आम्ही २० ते २२ जण निघालो होतो. आम्ही बसने गेलो होतो. काही ठिकाणाहून जाऊ दिले गेले, तर बऱ्याच ठिकाणी अडवले गेले, नानाविध प्रश्‍न विचारले गेले. आमच्या सोबतचे सर्व जण हिंदी बोलत होते. मराठीत कुणीच बोलत नव्हता. कारण ती ओळख होती की, आम्ही सगळे राम मंदिराशी संबंधित आहो याची, असे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीष व्यास ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

येथे काम करायला आलो होतो, नोकरीसाठी आलो होतो, आता परत चाललो, असे सांगत-सांगत आम्ही पुढे जात होतो. माझ्यासोबत अनंतराव निलदावार, मधुकरराव मुंजे, विलास मुंडले, नारायण यादव असे अनेक कार्यकर्ते होते. शेवटी प्रतापगडाच्या सिमेवर आम्हाला रोखण्यात आले. तेथून आमची रवानगी मध्यवर्ती कारागृहात झाली आणि आम्ही प्रत्यक्ष तेथे पोहोचू शकलो नाही. मात्र प्रतापगडच्या कारागृहात जेव्हा आम्ही पोचलो, तेव्हा लक्षात आलं की देशभरातून झारखंड, आसाम, बंगाल असे देशाच्या प्रत्येक राज्यातून कारसेवक आले होते आणि पकडले गेले होते, असे आमदार व्यास यांनी सांगितले.

रोज करत होतो उत्सव
मध्यवर्ती कारागृहात आमची एक कमिटी तयार झाली आणि तेथे आम्ही रोज आनंद साजरा करत होतो, उत्सव करत होतो. दरम्यान तिथले जेलर, त्यांचं नाव त्रिपाठी होतं. त्यांनी आम्हाला कारसेवकांनी घुमट पाडल्याची माहिती दिली. तेव्हा आम्ही मोठा आनंदोत्सव साजरा केला, तुळशीचं लग्न लावलं. चिवड्याचा महाप्रसाद बनवला आणि सर्वांना वाटला. मनाला चटका लावणारे अनेक प्रसंग आजही जसेच्या तसे आठवतात. तेव्हा जे कारसेवक शहीद झाले, त्यांची आज आम्हाला आठवण येते, त्यांना आम्ही वंदन करतो, असे आमदार व्यास म्हणाले.

२८ वर्षापूर्वी नागपुरातून मोठ्या संख्येने कारसेवक अयोध्येला गेले होते. काही पोचले, तर काहींना आधीच जेलमध्ये जावे लागले. शाळांमध्येही कारसेवकांना डांबून ठेवण्यात आले होते. जे पोचले त्यांनी तहाण-भूक विसरुन, रात्रंदिवस एक करुन कारसेवा केली, अशी आठवण कारसेवक परेश जोशी यांनी ‘सरकारनामा’ला सांगितली. श्री जोशी म्हणाले, आज २८ वर्ष झाले त्या गोष्टीला. आजही त्या दिवसाच्या आठवणी आमच्या मनात ताज्या आहेत. राम मंदिर होतेय, आज मंदिराचे भूमिपूजन होतेय. याचा अत्याधिक आनंद आम्ही आणि आमच्यासारख्या असंख्य राम भक्तांना होतोय, असेही जोशी म्हणाले.

आज राममंदिराचे भमिपूजन होतेय. या देशातीलच नव्हे, तर जगाच्या पाठीवर जिथे कुठे हिंदू आहे, त्या प्रत्येकासाठी आज आनंदाचा दिवस आहे. त्यावेळी विदर्भातूनही हजारो कारसेवक गेले होते. त्यामध्ये विधान परीषद सदस्य रामदास आंबटकर, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, आमदार गिरीष व्यास, महापौर संदीप जोशी, त्यांचे भाऊ परेश जोशी, आमदार मोहन मते, माजी आमदार जगदीश गुप्ता, माजी आमदार अरुण अडसड, माजी खासदार विजय मुडे यांच्यासह अनेकांचा समावेश होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख