पंढरपुरातील 'तुकाराम पॅटर्न' कामाची मुंडेंनाही भुरळ!  - Emotions expressed by Tukaram Munde about the work in Pandharpur | Politics Marathi News - Sarkarnama

पंढरपुरातील 'तुकाराम पॅटर्न' कामाची मुंडेंनाही भुरळ! 

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 4 जून 2020

नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून मुंडे सध्या कार्यरत आहेत. सतत काम करीत राहणे, हा त्यांचा स्वभाव. बुधवारी (ता 3) त्यांचा वाढदिवस. मात्र, पूर्ण दिवस ते कामात होते. नागपूर महापालिकेत काम करताना त्यांचे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांशी खटके उडत आहेत. या संदर्भाने एकूणच पंधरा वर्षांच्या कारकिर्दीबद्दल विचारले असता त्यांनी प्रत्येक ठिकाणच्या कामाचा लेखाजोखाच मांडला. 

पुणे : सलग झालेल्या बारा बदल्या. प्रत्येक ठिकाणी काम करताना राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत झालेले मतभेद. मात्र, या प्रत्येक ठिकाणी सामान्य जनतेने त्यांना डोक्‍यावर घेतलेले. बदली झाल्यानंतर ती रद्द व्हावी, यासाठी अनेक ठिकाणी सामान्यांनी केलेली आंदोलने, असा पंधरा वर्षांचा संघर्षाचा इतिहास असलेले सनदी आधिकारी तुकाराम मुंडे नेहमी चर्चेत असतात, ते त्यांचे धडाकेबाज काम आणि तितक्‍याच रोखठोक स्वभावामुळे. पंधरा वर्षांच्या या सेवेत प्रत्येक ठिकाणी व्यापक समाजहित आणि नियमांना समोर ठेऊन मनापासून काम केले. सोलापूरला जिल्हाधिकारी म्हणून काम करताना पंढरपूरला वारकऱ्यांसाठी अत्यंत कमी कालावधीत उभ्या केलेल्या सोयी-सुविधा राज्यात "तुकाराम पॅटर्न' म्हणून पुढे आल्या. 

नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून मुंडे सध्या कार्यरत आहेत. सतत काम करीत राहणे, हा त्यांचा स्वभाव. बुधवारी (ता 3) त्यांचा वाढदिवस. मात्र, पूर्ण दिवस ते कामात होते. नागपूर महापालिकेत काम करताना त्यांचे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांशी खटके उडत आहेत. या संदर्भाने एकूणच पंधरा वर्षांच्या कारकिर्दीबद्दल विचारले असता त्यांनी प्रत्येक ठिकाणच्या कामाचा लेखाजोखाच मांडला. 

समाजहिताला प्राधान्य 

माझ्याकडे आलेल्या प्रत्येक जबाबदारीत मी समाजहित समोर ठेवत नियमानुसार व मनापासून काम केले. प्रत्येक ठिकाणचे प्रश्‍न वेगवेळळे होते. सोलापूरमध्ये मला सलग अठरा महिने काम करता आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ""या काळात पंढरपूरच्या आषाढी वारीतील प्रशासन हाताळताना अनेक गोष्टी लक्षात आल्या. या काळात जुन्या पुलाशेजारी तब्बल 65 एकर क्षेत्रात पालखीतळ विकसित करता आला. अगदी कमी काळात हे काम पूर्ण झाले.'' 

पंढरपुरातील कामामुळे राज्यभर लौकिक 

ते म्हणाले की सार्वजनिक स्वच्छता हा वारीच्या काळातील पंढरपूरमधील महत्वाचा प्रश्‍न. आठ-दहा लाखांच्या संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांसाठी निवारा जितका महत्वाचा, त्यापेक्षा शौचालयांची व्यवस्था महत्वाची. मात्र, वर्षानुवर्षे वारकऱ्यांना शौचाला उघड्यावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. उपलब्ध व्यवस्था अत्यंत तोकडी होती. ही पद्धती अत्यंत वाईट आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चुकीची होती. या काळात नियोजन करून स्वतच्छतागृहांची व्यवस्था केली व वारीच्या काळातील उघड्यावर शौचाला जाण्याची पद्धती बंद केली. पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या पाहता हे काम मोठे कठीण आणि आव्हानात्मक होते. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर पंढरपुरातील हे काम राज्यासाठी "तुकाराम पॅटर्न' ठरला. 

'व्हीआयपी' दर्शन बंद 

"वारीच्या काळात राज्याच्या विविध भागातून येणारे पांडुरंगाचे भक्त दर्शनासाठी दोन-दोन दिवस रांगेत उभे राहत, तर दुसरीकडे "व्हीआयपी' दर्शन सुरू असायचे. काही लोकांसाठी असलेले हे "व्हीआयपी' दर्शन बंद करून दर्शनबारी सलग सुरू केली. त्यामुळे 25-30 तास रांगेत उभे राहणारा वारकरी 12 ते 18 तासांत दर्शन घेऊन बाहेर पडू लागला,' असे मुंडे म्हणाले. 

सोलापुरातील कामे आनंद देणारी 

त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात जलयुक्त शिवार ही योजना इतक्‍या क्षमतेने राबविली की सहाशे टॅंकरने पाणी पुरवठा होणारा जिल्हा दुसऱ्या वर्षी केवळ सहा टॅंकरवर आला. टॅंकरमुक्त जिल्हा आणि जलयुक्त शिवार ही सोलापुरात कामे करताना आनंद देणारी आणखी दोन महत्वाची कामेही केली. 

विविध ठिकाणी उमटवला कामाचा ठसा 

सन 2005 च्या सनदी सेवेच्या तुकडीतील मुंडे यांनी सेवेच्या प्रोबेशनरी कालावधीची सुरुवात सोलापूमधून केली. पुढे देगलूरला सहायक जिल्हाधिकारी, नागपूर, सोलापूर, वाशीम येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी, नाशिकला अतिरिक्त आदिवासी आयुक्त व महापालिका आयुक्त, नवी मुंबई महापालिका आयुक्त, पुण्यात पुणे परिवहन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, जालन्याला जिल्हाधिकारी, राज्य खादी बोर्डाचे संचालक, मुंबईत सहायक विक्रीकर आयुक्त तसेच एड्‌स कंट्रोल बोर्डाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. या सर्व ठिकाणी वेगळा ठसा उमटवणारे काम त्यांनी केले. विक्रीकर विभागात 143 कोटी रुपयांवरून 500 कोटींवर नेलेले वसुलीचे उत्पन्न त्यावेळी राज्यभर चर्चेचा विषय ठरले. "एचआयव्ही' चे संक्रमण रोखण्यासाठी मुंडे यांनी केलेल्या उपाययोजनांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख