आजार अंगावर काढू नका, तत्काळ प्रशासनाला कळवा : तुकाराम मुंढे

आता नागरिकांनीच चाचणीसाठी पुढाकार घेऊन लक्षणे असो अथवा नसो, प्रत्येकाने कोविडची चाचणी करून घेतल्यास लवकर निदान करता येईल. कोविड, सारी सोबतच अन्य रक्त तपासणी करून निदान करण्यात येईल. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाला आमदार निवास कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येईल.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe

नागपूर : शहराच्या वेगवेगळ्या परीसरांत २१ कोविड टेस्टींग सेंटर सुरू केलेले आहेत. याशिवाय खासगी तीन आणि शासकीय आठ प्रयोगशाळा आहेत. तेथेही कोरोनाची तपासणी करता येईल. कुठलाही आजार अंगावर काढू नका, तत्काळ प्रशासनाला त्याची माहिती द्या, जेणेकरुन लवकरात लवकर उपाय करुन कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल, असे महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आज म्हणाले.

नागरिकांनी किमान तपासणीसाठी तरी पुढाकार घ्यावा, जेणेकरुन त्यांना अतिरीक्त खर्च येणार नाही. प्रशासनाने तपासणी सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याचा फायदा नागरिकांना घेतला पाहिजे. आपण स्वतः, आपले कुटुंब आणि आपले शहर कोरोनापासून वाचू शकेल. कोरोना हा जिवघेणा आजार नाहीये, फक्त आपण त्याबाबतीत जागरुक असायला पाहिजे. वेळेवर तपासणी होऊन, लवकर उपचार मिळाले तर या आजारातून सुखरुप बाहेर पडता येते, असे आयुक्त मुंढे म्हणाले.

कारवाई शासनाच्या निर्देशांनुसारच
कोरोनाच्या स्थितीत जे कुणी आदेशांचे पालन करणार नाही, त्यांना शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार पाच हजार, आठ हजार आणि १० हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. याशिवाय एखाद्या गंभीर प्रकरणात गरज पडली तर गुन्हेदेखील दाखल करा, असेही आदेश पारित केले आहेत. पुढील काळात मोढी दुकाने जरी सुरू होणार असली तरी या उपाययोजनांमुळे गर्दी होणार नाही आणि कोरोनाचा प्रसार होणार नाही आणि शहर लवकरात लवकर कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडेल, असा विश्‍वास आयुक्त मुंढे यांनी व्यक्त केला.

घराजवळच करा कोविड तपासणी
महापालिकेने शहरातील विविध भागात कोविडसंदर्भातील सेवा सुरू केल्या आहेत. नागरिकांना आता घराजवळच कोविड तपासणी करता येणार आहे. शहरात २१ ठिकाणी कोविड तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. याशिवाय येथे समुपदेशन व अन्य सेवाही उपलब्ध आहेत. पालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागात एक असे एकूण ३८ कोव्हिड तपासणी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक नागरिकाला घराजवळ चाचणी करता यावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे आयुक्त मुंढे यांनी सांगितले. तूर्तास २१ ठिकाणी असे सेवा केंद्र सुरू करण्यात आले. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा व पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या किंवा लक्षणे असल्यास कोविड चाचणी करवून घ्यावी.

शहरात कोविडमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोविडचे उशिरा निदान होत असून अंतिम क्षणी उपचार घेण्यात येत असल्याने मृत्यूसंख्या वाढत आहे. आता नागरिकांनीच चाचणीसाठी पुढाकार घेऊन लक्षणे असो अथवा नसो, प्रत्येकाने कोविडची चाचणी करून घेतल्यास लवकर निदान करता येईल. कोविड, सारी सोबतच अन्य रक्त तपासणी करून निदान करण्यात येईल. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाला आमदार निवास कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येईल. तेथे अन्य तपासण्या केल्यानंतर कुठल्या रुग्णालयात उपचार घ्यायचे की गृह विलगीकरणात ठेवायचे, त्यादृष्टीने मनपाची चमू मार्गदर्शन करेल, अशी माहितीही मुंढे यांनी दिली.

झोननिहाय कोविड तपासणी केंद्र व वेळ
आशीनगर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रभाग सात, पाचपावली पोलिस क्वार्टर
धरमपेठ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रभाग १४, लॉ कॉलेज होस्टेल, रविभवन
प्रभाग १५, मॉरिस कॉलेज होस्टेल
सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग १३, फुटाळा, हजारीपहाड व तेलंगखेडी प्रा. आरोग्य केंद्र मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रभाग १०, राजनगर
सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग ९, इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र
सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग ११, झिंगाबाई टाकळी आरोग्य केंद्र
लक्ष्मीनगर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रभाग ३७, आरपीटीएस
सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग ३८, जयताळा प्राथमिक आरोग्य केंद्र
गांधीबाग सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग ८, मोमीनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र
सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग १९, भालदारपुरा प्रा. आरोग्य केंद्र
सतरंजीपुरा सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग २०, जागनाथ बुधवारी आरोग्य केंद्र
सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग २१, शांतीनगर प्रा. आरोग्य केंद्र
नेहरूनगर सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग २६, नंदनवन प्रा. आरोग्य केंद्र
सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग ३०, बिडीपेठ प्रा. आरोग्य केंद्र
लकडगंज सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग २५, पारडी प्रा. आरोग्य केंद्र
सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग २४, डिप्टी सिग्नल प्रा. आरोग्य केंद्र
धंतोली सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग ३३, बाबुळखेडा प्रा. आरोग्य केंद्र
(याशिवाय मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com