आयुक्तांमुळे ३५ लाख खर्चून बनविलेले कोविड सेंटर गेले ‘पाण्यात’ : विजय झलके

साहित्य खरेदीसाठी केवळ २४ तासांची निविदा काढली होती. एवढ्या घाईने निविदा काढून ३५ लाखांचे साहित्य खरेदी करण्यात आले. मात्र आज या साहित्याची दुरवस्था झाली आहे. आजपर्यंत एकही कोविड रुग्ण येथे आला नाही. रुग्ण येथे येण्यापूर्वीच येथील चादर, उशाही गायब झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण खर्च पाण्यात गेला असून महापालिकेच्या या नुकसानासाठी आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप झलके यांनी केला.
pintu zalke-tukaram mundhe
pintu zalke-tukaram mundhe

नागपूर : महानगरपालिकेने कोरोनाचा सामना करण्यासाठी कळमेश्‍वर मार्गावर ३५ लाख रुपये खर्च करुन कोविड केअर सेंटर उभारले. रुग्णसंख्या वाढल्यास व्यवस्था सज्ज असावी, या उद्देशाने हे सेंटर उभारण्यात आले होते. हेतू चांगला होता तरी वास्तवाचे भान न ठेवल्यामुळे ३५ लाख रुपये अक्षरशः पाण्यात गेले आहेत. गत मे महिन्यात सुसज्ज दिसत असलेली स्थिती सुंदर स्वप्न होते की काय, अशी शंका यावी, एवढे आजचे वास्तव भयानक आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यात आलेल्या मुसळधार पावसाने हे सेंटर उद्धवस्त झाले आहे. यासाठी सर्वस्वी आयुक्त तुकाराम मुंढे जबाबदार असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष विजय उर्फ पिंटू झलके यांनी केला आहे. 

शहरात वाढत्या कोरोनाबाधितांमुळे खाजगी रुग्णालयातही गर्दी होत आहे. या नागरिकांनाही आरोग्य सुविधा मिळाव्या, यासाठी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी आज अचानक पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यात महापालिका प्रशासनाचे पितळ उघडे पडले. आज आणि पुढील महिन्यातही पावसामुळे हे कथित कोविड केअर सेंटर काहीच कामाचे नसल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे येथील बेडवरील संपूर्ण गाद्या ओल्या झाल्या आहेत. अनेक बेड कोपऱ्यात गुंडाळून ठेवण्यात आले आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास कोविड केअर सेंटरमध्ये त्यांना आरोग्य सुविधा मिळेल, तेथेच उपचारही होतील, असा दावा त्यावेळी महापालिका प्रशासनाने केला होता. आज शहरात मोठ्‍या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. बेड मिळत नसल्याने त्यांना आता घरीच विलगीकरणात ठेवण्याची वेळ आली आहे.

या कोविड सेंटरबाबत केलेला दावा आता कुठे गेला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक १०० बेडच्या मागे २० डॉक्टर, वैद्यकीय चमू आणि इतर कर्मचाऱ्यांची टिम कार्यरत असणार, असाही दावा करण्यात आला होता. परंतु कोविड केअर सेंटर तयार करताना ना मनुष्यबळाचा ना शहरातील जुलै, ऑगस्टमधील पावसाचा विचार करण्यात आला, असे दिसून येत आहे. एकूणच दूरदृष्टीअभावी येथे गाद्या, चादर, उशी आदीवर महापालिकेने केलेला ५ लाखांचा खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या कचरा पेटीही एका कोपऱ्यात पडलेल्या अवस्थेत आहेत. ११ मे रोजी मोठा गाजावाजा करण्यात आलेल्या या कोव्हीड केअर सेंटरमध्ये श्वान फिरताना दिसून आले. एवढेच नव्हे तर पावसामुळे संपूर्ण परिसरच चिखलाचे साम्राज्य असून पायी फिरणेही कठीण आहे. ‘नाम बडे, दर्शन खोटे' अशी महापालिकेची स्थिती आहे.

नियोजन फसले
कोविड केअर सेंटरच्या निर्मितीची संकल्पना मे महिन्यात तयार झाली. त्यावेळी राधास्वामी सत्संग मंडळाचा परिसर अनुकूल होता. मात्र पावसाच्या दिवसांत कोविड केअर सेंटरचे काय होणार? याचा विचारच संकल्पनेत करण्यात आला नसल्याचे झलके यांनी सांगितले. जुलै, ऑगस्टमध्ये रुग्ण वाढणार असल्याचे भाकित काही संशोधकांनी केले होते. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याने नियोजन फसले.

२४ तासाच्या काढल्या होत्या निविदा
साहित्य खरेदीसाठी केवळ २४ तासांची निविदा काढली होती. एवढ्या घाईने निविदा काढून ३५ लाखांचे साहित्य खरेदी करण्यात आले. मात्र आज या साहित्याची दुरवस्था झाली आहे. आजपर्यंत एकही कोविड रुग्ण येथे आला नाही. रुग्ण येथे येण्यापूर्वीच येथील चादर, उशाही गायब झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण खर्च पाण्यात गेला असून महापालिकेच्या या नुकसानासाठी आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप झलके यांनी केला.  (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com