उपराजधानीतील ११ पोलीस विलगिकरणात, खाकीलाही पडतोय कोरोनाचा विळखा  - Corona Virus Gripping Police force in Maharashtra Eleven Policemen Sent to Quarantine | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

उपराजधानीतील ११ पोलीस विलगिकरणात, खाकीलाही पडतोय कोरोनाचा विळखा 

अनिल कांबळे 
शुक्रवार, 8 मे 2020

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉक्‍टर्स, वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह पोलिस विभाग रस्त्यावर लढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलिस रस्त्यावर तैनात आहेत. अनेक वाहनचालकांची तपासणी आणि वाहनांची जप्ती कारवाई करीत असताना पोलिसांचा नागरिकांशी थेट संबंध येतो. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव आता पोलिस विभागातही झाला आहे.

नागपूर : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यानंतरही नागरिकांचा फिरण्याचा उत्साह काही केल्या कमी होत नाही. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरले खरे. पण, आता पोलिसांना कोरोनाने विळखा घातला आहे. पहिल्यांदा नागपुरातील अकरा पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना संशयित म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. राज्यातील ५३१ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कोरोना बाधित आहेत तर पाच पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. 

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉक्‍टर्स, वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह पोलिस विभाग रस्त्यावर लढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलिस रस्त्यावर तैनात आहेत. अनेक वाहनचालकांची तपासणी आणि वाहनांची जप्ती कारवाई करीत असताना पोलिसांचा नागरिकांशी थेट संबंध येतो. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव आता पोलिस विभागातही झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पार्वतीनगरातील एक युवक कोरोनामुळे मरण पावला. 

त्या युवकाचा काका बेलतरोडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. त्या पोलिस कर्मचाऱ्यामुळे नागपूर शहर पोलिस दलातील बेलतरोडी आणि अजनी पोलिस स्टेशनमधील ११ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यां कोराना संशयित म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. नागपूर शहर पोलिस दलात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नाही. मात्र, आता बेलतरोडी आणि अजनी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांमुळे पहिल्यांदा पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव झाल्याचा संशय आहे. 

पोलिस प्रशिक्षण केंद्र राखीव 

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून नागपूर पोलिस रस्त्यावर तैनात आहेत. परंतु, कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने कोरोना झाल्यास त्यांना ठेवण्यासाठी लक्ष्मीनगरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात विलगीकरण कक्ष तयार करण्यात येणार आहे. येथे सुमारे ५०० पोलिस कर्मचाऱ्यांसाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. 

पोलिस विभागात भीतीचे वातावरण 

आज गुरुवारी एका दिवसात राज्यातील ३६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा आता ५३१ पोहोचला आहे. यामध्ये ५१पोलिस अधिकारी आणि ४८० पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत राज्यात ४३ पोलिस अधिकारी आणि ४४४ पोलिस कर्मचारी कोरोनासंक्रमित आहेत. तर आतापर्यंत ३९ कोरोनाबाधित पोलिस बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामध्यें मुंबईतील तीन, पुणे आणि सोलापूरमधील प्रत्येकी एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख