BJP's milk price hike agitation is a gimmick : Ravikant Tupkar | Sarkarnama

भाजपचे दूध दरवाढ आंदोलन म्हणजे नौटंकी : तुपकर 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

महायुतीचे दूध दरवाढ आंदोलन म्हणजे केवळ नौटंकी आहे. महायुतीला पक्षांना दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्याचा नैतिक अधिकारच उरला नाही, अशी घाणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. 

बुलडाणा : 'महायुतीचे दूध दरवाढ आंदोलन म्हणजे केवळ नौटंकी आहे. महायुतीला पक्षांना दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्याचा नैतिक अधिकारच उरला नाही,' अशी घाणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. 

गाईच्या दूधाला प्रति लिटर 30 रूपये दर मिळावा, सरकारने दुधाला प्रतिलिटर 10 रूपये अनुदान द्यावे, यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी शनिवारी (ता. 1 ऑगस्ट) भारतीय जनता पक्षासह महायुतीतील सहभागी पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. त्या आंदोलनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुपकर यांनी कडाडून हल्ला केला आहे. 

मागील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात दूध उत्पादकांचे कसे हाल झाले, हे सर्वश्रुत आहेत, त्यामुळे केवळ राज्य सरकारला विरोध करायचा; म्हणून दूध आंदोलन केले जात आहे. महायुती आणि त्यातील नेत्यांना शेतकऱ्यांचा कुठलाच कळवळा नाही, अशी खरपूस टीका तुपकर यांनी भाजपच्या दूध दरवाढ आंदोलनावर केली आहे. 

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच दूध दरवाढ आंदोलन केले होते. त्या आंदोलनाच्या दिवशी दिलेल्या इशाऱ्यानुसार 5 ऑगस्टपर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर येत्या 5 ऑगस्टनंतर संपूर्ण राज्यात एक थेंब दूध मिळू दिले जाणार नाही, अशा पद्धतीचे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे, असे ही तुपकर यांनी या वेळी बोलताना सांगितले. 

हेही वाचा : बा...विठ्ठला, मुक्‍या, बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारला सुबुद्धी दे 

पंढरपूर : राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार हे मुके, बहिरे आंधळे आहे. अशा सरकारला बा... विठ्ठला सुबुद्धी दे, असे साकडे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी (ता. 1 ऑगस्ट) विठ्ठलाला घातले. 

गाईच्या दूधाला प्रति लिटर 30 रूपये दर मिळावा, सरकारने प्रतिलिटर दुधाला 10 रूपये अनुदान द्यावे, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी शनिवारी रयत क्रांती संघटनेच्या वतीने पंढरपूर येथे आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सकाळी संत नामदेव पायरी जवळ विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले. या वेळी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख