भाजप खासदाराची राममंदिरासाठी तीस वर्षे शेंडी : मोदींमुळे कापण्याची अखेर मिळाली संधी

राममंदिराचे काम मार्गी लागल्याचे समाधान
MP Sunul Mendhe
MP Sunul Mendhe

भंडारा : अयोध्येत राममंदिर उभे राहावे यासाठी अनेकांनी संकल्प सोडले होते. तरुण वयात कारसेवक म्हणून अयोध्येत गेलेल्या एका व्यक्तिने राममंदिर होईपर्यंत डोक्यावर शेंडी ठेवण्याचा संकल्प केला होता. ही व्यक्ती पुढे खासदार झाली. या खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन सोहळा झाल्यानंतर ही शेंडी कापली.

भंडारा-गोंदिया मतदारसंघातील भाजपचे खासदार सुनील मेंढे असे या संकल्प ठेवणाऱ्यांचे नाव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून मेंढे यांनी सार्वजनिक कामास सुरवात केली. राममंदिरासाठी अयोध्येत विविध आंदोलने झाली. मेंढे हे 1989 पासून या आंदोलनात सहभागी झाले. वयाच्या 24 व्या वर्षीच त्यांनी मंदिरासाठी शेंडी ठेवण्याचा संकल्प केला होता. तो आता तीस वर्षांनंतर पूर्ण झाला आहे. 

भंडाऱ्यातील गांधी चौकात जाहीररित्या त्यांनी या संकल्पाची पूर्ती केली. शेंडी घेऊनच मेंढे इतकी वर्षे वावरत होते. भाजपचे कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षे कार्यरत असले तरी त्यांना गेल्या काही वर्षांत राजकीय पदांच्या संधी मिळाल्या. आधी भंडाऱ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले. नंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपने भंडारा-गोंदिया मतदारसंघातून संधी दिली. त्यात ते निवडून आले. संसदेतही त्यांच्या शेंडीकडे अनेकांचे लक्ष जात होते. तेव्हाही ते राममंदिरासाठी हा संकल्प असल्याचे सांगत होते.

माझ्यासारख्या कारसेवकाला खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली राममंदिराचे काम मार्गी लागले. यासारखा दुसरा आनंद नाही. मंदिराचे काम होणार की नाही, अशी शंका अनेक जण व्यक्त करत होते. भाजपवर टिकाही काहींनी केली. मात्र इतकी वर्षे पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे माझ्या संकल्पाची पूर्ती करण्याचे समाधान लाभल्याची भावना मेंढे यांनी व्यक्त केली. मेंढे यांचा फेटा बांधून या वेळी सत्कार करण्यात आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com