balasaheb thorat said mahavikas aghadi should fight with elections | Sarkarnama

बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीने निवडणुका सोबत लढाव्या !

निलेश डोये
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

वाळू चोरी रोखण्याबाबत शासनाने अनेक पाऊले उचलली आहेत. मंत्रीही स्वत: कारवाई करू शकतात. काही चुकीचे होत असल्यास तपासून पाहिले जाईल. काही त्रुटी असल्यास त्या जिल्हाधिकारी दूर करतील, असे महसूलमंत्री थोरात यांनी स्पष्ट केले. 

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यातील महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढाव्या, असा मानस कॉंग्रेसचा असल्याचे राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. कोरोनाबाबतचा आढावा थोरात यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,
आगामी महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने मिळून लढवावी, असा काँग्रेसचा मानस असला तरी याबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकींना अधिकाऱ्यांना उपस्थित न राहण्याच्या आदेशावर उत्तर देताना ते म्हणाले की, हा आदेश फडणवीस मुख्यमंत्री असताच काढण्यात आला होता. प्रशासनाकडून त्याची फक्त अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे यावर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण गंभीर नाहीत. राज्य सरकार न्यायालयात मराठा समाचाजी बाजू प्रभावीपणे मांडत नाही. मराठा आरक्षणाच्या विषयाचे विनाकारण कुणी राजकारण करू नये. यासंदर्भात अशोक चव्हाण चांगले काम करताहेत. सातत्याने बैठका घेताहेत. देशातले नामांकित वकील आपण यासाठी उभे केले आहेत. त्यामुळे विनायक मेटेंनी केलेले आरोप निराधार आहेत.

मराठा प्रश्‍नावर वातावरण दूषीत करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. मराठा आरक्षणचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. हा निकाल लागल्यावरच मराठा आरक्षणानुसार पद भरती करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सारथी संस्थेची जबाबदारी ही काँग्रेसकडेच असून लवकरच नवीन मंत्र्यांकडे याची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे थोरात यांनी सांगितले. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, आ. विकास ठाकरे, राजू पारवे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते.

वाळू चोरी रोखण्यातील त्रुटी दूर करणार
वाळू चोरी रोखण्याबाबत शासनाने अनेक पाऊले उचलली आहेत. मंत्रीही स्वत: कारवाई करू शकतात. काही चुकीचे होत असल्यास तपासून पाहिले जाईल. काही त्रुटी असल्यास त्या जिल्हाधिकारी दूर करतील, असे महसूलमंत्री थोरात यांनी स्पष्ट केले.  (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख