नारायण दाभाडकरांनी खरंच तरूणाला बेड दिला का? अखेर मुलीनेच सांगितलं सत्य

दाभाडकर यांच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते.
Asavari Kothiwan has revealed about the sacrifice of his father Narayan Dabhadkar
Asavari Kothiwan has revealed about the sacrifice of his father Narayan Dabhadkar

नागपूर : कोरोना महामारीमध्ये रुग्णालयात बेड मिळवणं, म्हणजे मोठं दिव्यच. नागपूरातील 85 वर्षांच्या नारायण दाभाडकर यांच्यासाठी कुटूंबियांनी पाच-सहा तासांच्या प्रयत्नानंतर बेड मिळवला. पण रुग्णालयात आलेल्या चाळिशीतल्या तरूणाला बेड मिळत नसल्याचे पाहून ते आपला बेड सोडून घरी गेले. त्यानंतर घरीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण दाभाडकर यांनी खरंच बेड सोडला का?, यावरून आता सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याबाबतची एक अॅाडिओ क्लीपही व्हायरल झाली आहे. 

दाभाडकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यावरून काही संघविरोधी लोकांनी सोशल मीडियावर दाभाडकर यांच्या त्यागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वाद सुरू झाला होता. या वादानंतर आता दाभाडकर यांची मुलगी आसावरी कोठीवान यांनीच याबाबत खुलासा केला आहे. एका व्हिडिओद्वारे त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगत आपल्या वडिलांच्या त्यागाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सध्या माझ्या वडिलांनी केलेल्या त्यागावर खूप चर्चा सुरू आहे. माझे वडील आणि माझे कुटूंब सर्वजण कोरोनाने बाधित होतो. माझ्या वडिलांची प्रकृती खालावल्याने 21 तारखेला त्यांना खूप प्रयत्नांनंतर महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात बेड मिळाला. माझे सासरेही घरात अत्यवस्थ असून पतीला खूप ताप होता. त्यामुळं मी त्यांना सोडून जाऊ शकत नव्हते. म्हणून रुग्णवाहिका बोलावून माझी बहीण व जावयाला त्यांच्यासोबत रुग्णालयात पाठवलं. 

रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यांची अॅाक्सीजन लेवल 50-55 पर्यंत खाली आली होती. लगेच अॅाक्सीजन लावले, दोन इंजेक्शन दिली. एक्स-रे करण्यात आला. त्यामध्ये संसर्ग खूप वाढल्याचे दिसून आले. ते एवढे सहन करू शकतील की नाही, असे डॅाक्टरांनी सांगितलं. याचवेळी रुग्णालयाच्या कॅारीडॅारमध्ये गोंधळ सुरू होता. बेड मिळण्यासाठी रडण्याचा आवाज येत होता. त्यांच्या अडचणी पाहून वडिलांचं मन विरघळलं, असे आसावरी यांनी सांगितले.

मी माझं आयुष्य जगलो आहे

वडिलांना असं वाटलं की, 'मी आज ना उद्या जाणार आहे. डॅाक्टर म्हणत आहेत की, माझी स्थिती नाजूक आहे. आपण घरी जायचं आणि हा बेड रिकामा करायचा. कुणाच्या तरी कामाला येईल.' त्यांना तो आवाज बघवत नव्हता. माझी बहीण व जावयांनी त्यांना खूप समजवलं. पण त्यांना ते पटत नव्हते. त्यांनी मग मला फोन करायला लावला. 'मला घरी घेऊन चल, मला बेड सोडायचा आहे. मी 85 वर्षांचा झालो आहे. मी माझं आयुष्य जगलो आहे,' असे वडील म्हणाल्यानंतर मला एक क्षण काहीच सुचले नाही, मी त्यांना काय बोलू. माझ्यापुढे खूप मोठा प्रश्न होता, असे आसावरी यांनी म्हटलं आहे. 

वडिलांनी ऐकलंच नाही

मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, 'बाबा, पाच-सहा तास प्रयत्न करून बेड मिळालाय. आता जर तुम्ही बेड सोडला तर तुम्ही वाचणार नाही.' ते म्हणाले, 'त्याची मला पर्वा नाही. मी घरी येतोय.' ते निघण्याची तयारी करू लागले. शेवटी जावयांनी डॅाक्टरांना डिस्चार्ड देण्यास सांगितले. डॅाक्टरांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण अखेर तेही तयार झाले, असे आसावरी यांनी स्पष्ट केलं.

दीड दिवसातच घेतला जगाचा निरोप

डिस्चार्ज घेताना रुग्णालयात बेड का सोडतोय, याचे काहीच कारण तिथे सांगितले नाही. फक्त कुटूंबियांना सांगितले होते. तिथून मग रुग्णवाहिकेने त्यांना घरी आणले. पुढे दीड दिवस ते घरी राहिले आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी केलेल्या परोपकाराचे आम्हाला कुणालाही भांडवल करायचे नाही. त्यांच्या परोपकाराचे मोल नाही. ते कुणीही करू शकणार नाही. त्यांनी केलेला त्याग आमच्यासाठी आदर्श राहील. त्यांनी त्याचा कुठलाही उहापोह न करता या जगातून निघून गेले, अशी भावना आसावरी यांनी व्यक्त केली.

त्या तरूणाला बेड मिळाला का?

रुग्णालयात बेडसाठी रडण्याचा आवाज ऐकून दाभाडकर यांनी बेड सोडत घरी जाण्याचा निर्णय घेतला. एका चाळिशीतल्या तरूणासाठी त्यांनी बेड सोडल्याचे बोलले जाते. पण त्या तरूणाला हा बेड मिळाला की नाही, याबाबत कुटूंबियांनाही काही माहित नाही. 'बेड कुणाला दिला, इतर कुणाला मिळाला हे काहीही माहित नाही. वडिलांनी डॅाक्टरांना त्यांच्या मनात काही विचार सुरू आहे,' हे सांगितले नव्हते, असेही आसावरी यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com