कृषिमंत्र्यांनी सोयाबीनची पाहणी केली, पण सर्वेक्षणाचे आदेश नाही - the agriculture minister inspected the soybeans but did not order a survey | Politics Marathi News - Sarkarnama

कृषिमंत्र्यांनी सोयाबीनची पाहणी केली, पण सर्वेक्षणाचे आदेश नाही

अतुल मेहेरे
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकेल ते पिकेल, यानुसार मंडळनिहाय पिकांचे क्लस्टर करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यात संत्र्यांचे सहा, भिवापुरी मिरची, जवस यांचे प्रत्येकी एक डाळी व कापसाचे चार क्लस्टर तयार करण्यात आले.

नागपूर : यावर्षी चांगले पीक होईल, असा अंदाज शेतकऱ्यांचा होता. पण गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर संकट आले आहे. सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने आणि आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासोबत जिल्ह्याचा दौरा केला आणि शेतांमध्ये जाऊन सोयाबीन पिकांची पाहणी केली. सोयाबीनचे झालेले नुकसान पाहता सर्वेक्षणाचे आदेश ते देतील, असे वाटत होते. मात्र त्यांनी तसे आदेश दिले नसल्याचे सूत्राने सांगितले. 

जास्त पावसामुळे सोयाबीनचे पाने पिवळी पडत असून खोडमाशी, चक्रीभुंगा किडीसोबत मुळतड रोगाचा प्रादुर्भाव झाला असून जिल्ह्यात ४० ते ४५ हजार हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे. परंतु अद्याप सर्वेक्षणाच्या सूचना करण्यात नाही. कृषी विभागाकडून यंदा जिल्ह्यासाठी खरिपाचे ५ लाख १०० हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. यंदा सोयाबीनचे नियोजित क्षेत्र ८५ हजार हेक्टर इतके होते. परंतु शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे होता. त्यामुळे यंदा याच्या क्षेत्रात वाढ झाली. १ लाख २२२२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. सोयाबीनचे पीक यंदा चांगले होण्याचा अंदाज शेतकऱ्यांना होता. सोयाबीनची पाने पिवळी पडत आहे. 

नुकतेच कृषी विद्यापीठातील कीटशास्त्र डॉ. हरिष सवई व कृषी वनस्पती रोग शास्त्र विभागाचे डॉ. मोहन पाटील यांच्या पथकाने जिल्ह्यातील अनेक शेतांची पाहणी केली. पिकांवर खोडमाशी आणि चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव दिसून आला. तसेच सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा असल्याने झाडाच्या मुळाद्वारे अन्न शोषण करण्याची प्रक्रिया मंदावली असून पुरेशी हवा मिळत नाही. यामुळे पाने, फुले गळायला लागली आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. परंतु अद्याप सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले नाही. कृषी मंत्री भुसे यांनी वर्धा मार्गावरील मोहगाव येथील सोयाबीन शेतीची पाहणी केली. परंतु सर्वेक्षणाचे आदेश दिले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 

नुकसान भरपाई द्या : सलील देशमुख 
सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यावर हे नवे संकट उभे ठाकले आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाचा सर्वे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता व जिल्हा परिषद सदस्य देशमुख यांनी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदन देऊन केली. यावेळी जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष बंडोपंत उमरकर, डॉ. अनिल ठाकरे, बापू चरडे, ओम खत्री, जयंत टालाटुले, नरेश तवले यांच्यासह शेतकरी होते. 

सर्वेक्षण करा : निधान 
सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे नुकसान होत आहे. तात्काळ सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिले.

विकेल ते पिकेल योजनेत जिल्ह्यात १३ क्लस्टर 
शेतात काम करताना होणाऱ्या अपघाताच्या वाढत्या घटना पाहता शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळण्यासाठी कृषी सहायकांनी गावपातळीवरील अशा अपघातांच्या घटनांची स्वेच्छेने नोंद घेऊन कार्यवाही करावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले. वनामती येथे त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा उपनिबंधक अजय कडू, विभागीय उपसहनिबंधक संजय कदम उपस्थित होते. 

कृषी विभागातील कृषी सहायकापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी शासकीय चौकटीच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या कालावधीतही कृषी विभागाने  राबविलेल्या नावीन्यपूर्ण रानभाज्या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल कृषी मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. अपघात विमा योजनेत आतापर्यंत ५१ प्रस्ताव सादर झाले असून त्रुटी दूर करण्याची कारवाई सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकेल ते पिकेल, यानुसार मंडळनिहाय पिकांचे क्लस्टर करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यात संत्र्यांचे सहा, भिवापुरी मिरची, जवस यांचे प्रत्येकी एक डाळी व कापसाचे चार क्लस्टर तयार करण्यात आले. या पिकांच्या क्लस्टर संदर्भातील प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा, असे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले. खरीप पीक कर्जाचे आतापर्यत ६५ टक्के वाटप पूर्ण झाले असून पूर्ण हंगामात अंदाजे ८० टक्क्यांपर्यंत वाटप होईल. आतापर्यत जिल्ह्यात ४० हजार ४५१ शेतकऱ्यांना ३४७ कोटी कर्ज वाटप झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कडू यांनी दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख